पती-पत्नीचे भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:05 PM2019-07-26T12:05:03+5:302019-07-26T12:05:29+5:30
पत्नीला मारत आणले गल्लीत
जळगाव : नवरा, बायकोचे सुरु असलेले भांडण सोडवायला गेलेल्या योगेश नामदेव जंगले (३७) या तरुणाचा पतीने तीक्ष्ण हत्याराने खून केल्याची घटना गुरुवारी रात्री १० वाजता रामेश्वर कॉलनीतील सप्तश्रृंगी नगरात घडली. हल्लेखोर गणेश सखाराम भंडारे (गोंधळी) हा फरार झाला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सप्तश्रृंगी नगरात संत ज्ञानेश्वर पूर्व माध्यमिक विद्यालयाच्या समोरच गणेश भंडारे हा पत्नी भारती व तीन मुलांसह वास्तव्याला आहे. गणेश याला दारुचे व्यसन असल्याने रोज बायकोशी त्याचे भांडण होते. गुरुवारी रात्री बायकोला मारहाण करीत त्याने गल्लीत ओढत आणले. हा प्रकार पाहून गल्लीतच राहणारा योगेश जंगले हा भांडण सोडविण्यासाठी गेला असता गणेश याने त्याच्याजवळील तीक्ष्ण हत्याराने योगेशवर सपासप वार केले. त्यात तो जागीच गतप्राण झाला. हा प्रकार पाहून मद्याच्या नशेत असलेला गणेश तातडीने तेथून फरार झाला.
मृत योगेश जैन कंपनीत चालक
योगेश जंगले हा जैन कंपनीत चालक आहे. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. संशयित आरोपी गणेश हा मुळचा जळगाव जामोद येथील रहिवाशी असून दोन वर्षापासून तो रामेश्वर कॉलनीत वास्तव्याला आला आहे.
गल्लीत सर्वत्र रक्ताचे डाग
खूनाची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विशाल वाठोरे, सहायक फौजदार रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, विजय नेरकर, जितेंद्र राजपूत व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या योगेश वंजारी याला जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. या घटनेचा योगेशच्या पत्नीला प्रचंड धक्का बसला. तिने जिल्हा रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. दरम्यान, घटनास्थळावर व गल्लीत ठिकठिकाणी रक्ताचे डाग पडलेले होते.
घटना सीसीटीव्हीत कैद
गणेश याने रस्त्यावरच योगेशवर वार केले. समोरच संत ज्ञानेश्वर पूर्व माध्यमिक विद्यालय असून तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ही संपूर्ण घटना कॅमेºयात कैद झाली आहे. दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके व सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी घटनास्थळी भेट देवून रहिवाशांकडून घटनेची माहिती जाणून घेतली. संशयित गणेश भंडारे याच्या शोधार्थ पोलिसांचे पथक रवाना केले.