चोपड्यात गावठी कट्ट्यासह कोळंब्याचा तरुण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 10:06 PM2019-10-14T22:06:40+5:302019-10-14T22:06:44+5:30
चोपडा : येथे चोपडा-धरणगाव रस्त्यावर कोळंबा येथील एका तरुणाकडे गावठी पिस्तूल आढळून आले. मुद्देमालासह पोलीसांनी तरुणास रविवारी सायंकाळी सव्वासातच्या ...
चोपडा : येथे चोपडा-धरणगाव रस्त्यावर कोळंबा येथील एका तरुणाकडे गावठी पिस्तूल आढळून आले. मुद्देमालासह पोलीसांनी तरुणास रविवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ताब्यात घेतले असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील कोळंबा येथील रहिवासी योगेश पन्नालाल भोई (वय २०) हा चोपडा ते धरणगाव रस्त्याने जात असून त्याच्या ताब्यात एक गावठी कट्टा व जिवंत काडतूस असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखा पोलिसांना मिळाली होती.
धरणगाव रोडवर रचला सापळा
पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाने पथक चोपडा शहर पोलीस स्टेशनला पोहचले. शहर पोलीस स्टशनचे प्रभारी अधिकारी विनायक लोकरे यांना फोनद्वारे माहिती दिली असता त्यांनी पोलीस नाईक प्रदीप राजपूत, शेषराव तोरे, प्रकाश मथुरे, मिलिंद सपकाळे यांना मदतीसाठी पाठविले. पोलिसांनी चोपडा ते धरणगाव मार्गावर शिरपूर बायपास जवळ सापळा रचला. सांयकाळी सव्वासातच्या सुमारास आरोपी याच मार्गाने पाटचारीकडुन शिरपुर बायपासकडे पायी येत असताना त्यास जागीच पकडले.
त्याची झडती घेतली असता कमरेला एक गावठी कट्टा व पॅन्टच्या उजव्या खिशात एक जिवंत काडतूस मिळून आले. त्याच्यासह १५ हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे काळया रंगाचे पिस्तूल व १ हजाराचे काडतूस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सदर मुद्देमाल जप्त करुन आरोपी योगेश भोई यास ताब्यात घेतले. जळगाव येथील पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, प्रविण हिवराळे यांचा समावेश होता.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखा पोलीस नाईक मनोज दुसाने यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला योगेश भोई याच्याविरुद्ध गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. पोस्लीस तपास करीत आहेत.