पश्चिम बंगालचा तरुण करतोय सायकलीवरून भारत भ्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:11 AM2021-06-29T04:11:58+5:302021-06-29T04:11:58+5:30
भडगाव तालुक्यातील कजगाव रस्त्यावर तांदूळवाडी फाट्याजवळ गोंडगाव येथील विद्यालयाच्या शिक्षकांनी त्याची भेट घेत सविस्तर चर्चा केली व त्याचे या ...
भडगाव तालुक्यातील कजगाव रस्त्यावर तांदूळवाडी फाट्याजवळ गोंडगाव येथील विद्यालयाच्या शिक्षकांनी त्याची भेट घेत सविस्तर चर्चा केली व त्याचे या कार्याबद्दल स्वागत केले. गोंडगाव विद्यालयाचे शिक्षक कजगाव रस्त्याने जात असताना थांबून या सिलीगुडीया गावातील मधाई पाॅल या तरुणाशी त्यांनी संवाद साधला. यात मुख्याध्यापक जी. के. सानप, भूषण साळुंखे, वसंत पाटील, भूषण सावंत यांनी या तरुणाची भेट घेतली. भारत भ्रमण सायकलवर करण्याचा उद्देश त्याच्याकडून जाणून घेतल्यावर त्याने सांगितले की, भारतातील संस्कृती, माती, पर्यावरण, विविधता तसेच सुरक्षित वाहन चालवा, जीव वाचवा.. यासंदर्भात जनजागृतीपर संदेश पोहोचवण्याचे काम संपूर्ण देशभर करीत आहे. आतापर्यंत ओरिसा, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र असा सायकलीवर जनजागृतीचा संदेश देत भ्रमण सुरू आहे. आतापर्यंत ७ महिन्यांत या तरुणाने जवळजवळ १३ हजार ते १४ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. दिवसाला १०० ते १२० किलोमीटर प्रवास नित्याने सुरू आहे.
या तरुणाला पुढील एक वर्षात गुजरात, राजस्थान, पंजाब, काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल असा प्रवास करायचा आहे, असे त्याने सांगितले. या शिक्षकांनी या तरुणाला शुभेच्छा देऊन आरोग्याची काळजी घेण्यास सांगितले. भारतभर सायकलवर भ्रमण करीत जनजागृतीचा संदेश देणाऱ्या तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सायकलीवर प्रवास केल्याने व नियमित सायकल चालविल्यास शरीराला मोठा व्यायाम मिळतो. शरीर सुदृढ होण्यास व आरोग्य जपण्यास फायद्याचे ठरते, अशीही माहिती दिली.
===Photopath===
280621\28jal_1_28062021_12.jpg
===Caption===
तांदूळवाडी रस्त्यावर मधाई पाॅल या तरुणाचे स्वागत करताना जे. के. सानप, भूषण साळुंखे, वसंत पाटील आदी.