मामाच्या साखरपुड्याला निघालेला तरुण अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:12 AM2021-07-19T04:12:47+5:302021-07-19T04:12:47+5:30
जळगाव : बामणोद,ता.यावल येथे चुलत मामाच्या साखरपुड्याला जायला निघालेला सोपान सुभाष शिरसाठ (वय २५,रा.देवगाव, ता.जळगाव, मुळ रा.कुसुंबा,ता.चोपडा) हा तरुण ...
जळगाव : बामणोद,ता.यावल येथे चुलत मामाच्या साखरपुड्याला जायला निघालेला सोपान सुभाष शिरसाठ (वय २५,रा.देवगाव, ता.जळगाव, मुळ रा.कुसुंबा,ता.चोपडा) हा तरुण अर्ध्या रस्त्यातून परत झाला आणि घरी जाताना राष्ट्रीय महामार्गावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठानजीक असलेल्या ढाब्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी साडे तीन वाजता घडली.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपान याच्या चुलत मामाचा रविवारी बामणोद, ता.यावल येथे साखरपुडा होता. त्यासाठी सकाळीच तो दुचाकीने (क्र.एम.एच.१९ डी.एम.६६५३) बामणोदकडे निघाला. विदगावपर्यंत गेला व तेथून तो माघारी फिरला. मागे का फिरला याचे कारण कोणालाच माहिती नाही. पाळधीमार्गे घरी जात असताना राष्ट्रीय महामार्गावर विद्यापीठानजीक अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात तो जागीच गतप्राण झाला. घटनास्थळावर तरुणाचा मृतदेह पाहून काही लोकांनी पाळधीत माहिती दिली. एका रुग्णवाहिकेतून त्याला जिल्हा सरकारी रुग्णालयात आणण्यात आले. तेथे वैद्यकिय अधिकारी डॉ.सचिन अहिरे यांनी त्यास मृत घोषीत केले. मृतदेहाची ओळख पटली नसल्याने डॉ.अहिरे यांनी पाळधी पोलिसांना घटनेची माहिती कळविली. दरम्यान, गेल्या आठ दिवसापासून महामार्ग तसेच राज्यमार्गावर अपघातांची मालिकाच सुरु झालेली आहे.
सख्या मामाच्या ढाब्याजवळ अपघात
सोपान याचा ज्या ठिकाणी अपघात झाला तेथेच सख्खा मामा कैलास नामदेव सोनवणे (रा.सत्यम पार्क, जळगाव) यांचा ढाबा आहे. दुचाकीवरुन ढाब्यावरील काही लोकांनी कैलास यांना घटनेची माहिती कळविली. कैलास यांनी दुसरे भाऊ वासुदेव यांना सोबत घेऊन रुग्णालय गाठले असता मृतदेह सोपानचाच असल्याचे निष्पन्न झाले. सोपान याच्या आई जनाबाई यांची देखील प्रकृती बिघडलेली आहे. त्यामुळे या अपघाताची माहिती त्यांना देण्यात आली नाही. सोपान याचे वडील सुभाष उत्तम शिरसाठ हे शेती करतात. तीन बहिणी असून त्या विवाहित आहेत. सोपान अविवाहित होता.