झटापट करून तरुणाचा मोबाइल, पैसे लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:13 AM2021-06-29T04:13:02+5:302021-06-29T04:13:02+5:30
जळगाव : दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पावसामुळे दुकानाच्या पायरीवर थांबलेल्या योगेश कैलास शिरसाळे (रा. समता नगर) या तरुणाशी झटापट करुन ...
जळगाव : दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पावसामुळे दुकानाच्या पायरीवर थांबलेल्या योगेश कैलास शिरसाळे (रा. समता नगर) या तरुणाशी झटापट करुन त्याच्या हातातील मोबाइल, तीनशे रुपये व एटीएम कार्ड घेऊन पोबारा केल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजता नेरी नाका स्मशानभूमीजवळ घडली. दरम्यान, याप्रकरणी सोमवारी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन दोघांना अटक करण्यात आली. संदीप तुकाराम सोनवणे (वय २५), गोकूळ पांडुरंग जाधव (वय २७, दोन्ही रा.मारुती पेठ) व प्रशांत प्रताप चौधरी (रा.शंकरराव नगर) अशी तिघांची नावे आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश हा नूतन मराठा महाविद्यालयात पदवीच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे. रविवारी अजिंठा चौकाकडे असताना दुपारी अडीच वाजता योगेश हा मित्र अमोल सुनील वडनेरे याला सराफ बाजारात घ्यायला जात असताना पाऊस सुरू झाल्यामुळे नेरी नाका स्मशानभूमीजवळील व्यापारी संकुलाच्या पायरीजवळ थांबला असता दुचाकीवरून तीन जण आले. त्यांनी योगेशशी झटापट करून मोबाइल, पैसे व एटीएमकार्ड घेऊन पलायन केले. यावेळी योगेश याने गोपाळपुरा, का.ऊ.कोल्हे शाळेपर्यंत पाठलाग केला असता ते दुचाकीवरून खाली पडले. त्यामुळे दुचाकी जागेवरच सोडून पळून गेले.
दरम्यान, सायंकाळी योगेश याने संशयितांची दुचाकी घेऊन शनिपेठ पोलीस स्टेशन गाठले. गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार रवींद्र पाटील, अमोल विसपुते, अभिजित सैदाणे,परीश जाधव, मुकुंद गंगावणे, अनिल कांबळे, राहुल पाटील व राहुल घेटे यांनी दुचाकी नंबरवर संशयितांची नावे निष्पन्न केली. सोमवारी पहाटे या प्रकरणी तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर संदीप व गोकूळ यांना सकाळी तर प्रशांत याला सायंकाळी अटक करण्यात आली. अटकेतील न्यायालयाने त्यांना ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. उपनिरीक्षक खेमराज परदेशी तपास करीत आहेत.