तरुणांनो देशाच्या रक्षणासाठी सैन्यात दाखल व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2017 06:07 PM2017-03-28T18:07:36+5:302017-03-28T18:07:36+5:30
देशाच्या रक्षणासाठी सैन्यदल, नौदल व वायुसेनेत भरती व्हावे असे आवाहन भारतीय नौदलाचे व्हाईस अॅडमिरल सुनील भोकरे यांनी गुढे, ता.भडगाव येथे झालेल्या नागरी सत्काराप्रसंगी सांगितले.
व्हाईस अॅडमिरल सुनील भोकरे : गुढे येथे भव्य नागरी सत्कार
गुढे, ता.भडगाव, दि.28- ग्रामीण भागातील तरुणांची बौद्धीक व शारीरिक क्षमता अफाट आहे. त्यांनी देशाच्या रक्षणासाठी सैन्यदल, नौदल व वायुसेनेत भरती व्हावे असे आवाहन भारतीय नौदलाचे व्हाईस अॅडमिरल सुनील भोकरे यांनी गुढे, ता.भडगाव येथे झालेल्या नागरी सत्काराप्रसंगी सांगितले.
भारतीय नौदलाच्या व्हाईस अॅडमिरल पदी सुनील भोकरे यांची नियुक्ती झाल्यानंतर ते पहिल्यांदा जन्मगाव गुढे येथे आले. मंगळवारी सकाळी 9 वाजता ते गावाच्या वेशीजवळ दाखल झाल्यानंतर या ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी काढलेल्या मिरवणुकीत लेझीम पथकातील विद्याथ्र्यानी सहभाग घेतला. स्वागत मिरवणुकी दरम्यान गावातील महिलांकडून सुनील भोकरे यांचे ठिकठिकाणी औक्षण करण्यात येत होते. सुरुवातीला आपल्या नातेवाईकांच्या घरी भेट दिल्यानंतर ते शिवाजी चौकातील सत्कार समारंभस्थळी दाखल झाले.
व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पाचो:याचे आमदार किशोर पाटील, नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष कृष्णराव पाटील, जि.प.सदस्य विकास पाटील, वडिल वसंतराव भोकरे, आई इंदूताई भोकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नागरी सत्कार समिती पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते व्हाईस अॅडमिरल सुनील भोकरे यांना पुष्पगुच्छ, मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सत्काराला उत्तर देताना भोकरे यांनी सांगितले की, लहानपणी गावात असताना काकासोबत पाटावर पोहण्यासाठी जात होतो. नौदलात काम करताना त्याचा लाभ झाला. ग्रामीण भागातील असल्याने नौदलाच्या खडतर प्रशिक्षणा दरम्यान त्याचा लाभ झाला. पुढे सैनिकी शाळेत दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला शिस्त, स्वच्छता आणि वेळेचे महत्त्व समजले. जीवनात अनेक सन्मान मिळाले. व्हाईस अॅडमिरलच्या पदवीमुळे देशाचे रक्षण करण्याची संधी मिळाली आहे. मात्र आजही आपण ग्रामीण जीवनाला विसरलेलो नाही. सुटीनिमित्त गावाकडे आल्यानंतर आजही आपण शेतातील गुरांचे शेणपाणी करीत असल्याचे आपण सहका:यांना सांगत असतो. ग्रामीण भागातील तरुणांमध्ये मोठी क्षमता आहे. त्यामुळे त्यांनी सैन्यात दाखल होऊन देश सेवा करावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी भडगाव पं.स.सभापती हेमलता पाटील, सरपंच प्रतिभा माळी, विकासो चेअरमन यशवंत पाटील, उद्धव महाजन, हिरामण चौधरी, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष भगवान महाजन, मिलींद भोकरे, स्वप्निल भोकरे, राजेंद्र भोकरे, गजानन भोकरे, सुरेखा भोकरे, चेतना भोकरे, मोनाली भोकरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.