अपहरणाचा बनाव करुन तरुणीने केले प्रियकरासोबत लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:29 PM2021-03-23T16:29:44+5:302021-03-23T16:30:38+5:30
लग्न ठरलेल्या तरुणीने अपहरणाचा बनाव करून प्रियकरासोबत पळून जाऊन नंतर स्वत:च लग्नाचे काढलेले फोटो तपास करणाऱ्या पोलिसांच्या मोबाईलवर टाकले
लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : लग्न ठरलेल्या तरुणीने अपहरणाचा बनाव करून प्रियकरासोबत पळून जाऊन गुजरातमध्ये लग्न केल्याची घटना उघडकीस आली. तरुणीने लग्नानंतर काढलेले फोटो तपास करणाऱ्या पोलिसांच्या मोबाईलवर टाकल्याने पोलिसही चक्रावले.
शहरातील तरुणीचा विवाह या आठवड्यात होणार होता. लग्न बस्ता व इतर खरेदी झाली होती. दोन दिवसांपूर्वी तरुणी नातेवाईकांसोबत रुग्णालयात जाण्यासाठी बाजारपेठेत येत होती. नातेवाईक पुढे व तरुणी मोबाईलवर बोलत मागे चालत होती. अचानक एक वाहन तिच्याजवळ येऊन थांबले व त्यात बसून ती निघून गेली. पुढे चालत असलेल्या नातेवाईकांच्या लक्षात ही बाब येताच त्यांच्या चिंतेत वाढ झाली. याच वेळेस तरुणीने वडिलांना मोबाईलवर फोन करून सांगितले की, कुणीतरी माझे अपहरण केले आहे. हात, पाय बांधून मला नेले जात आहे. वडिलांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठले.
पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी कर्मचारी मुकेश अमोदकर यांचेकडे तपास सोपविला. त्यांनी मिसिंग दाखल करून तरुणीच्या फोटोसह माहिती राज्यातील व गुजरात पोलिसांना कळविली. दरम्यानच्या काळात तरुणीचे व नातेवाईकांचे मोबाईल तपासणे सुरूच होते. तरुणीचे लोकेशन काही सापडत नसल्याने पोलिसांची चिंता वाढली. गुजराथ पोलीस तपास करीत असताना गुजरात पोलीसांना त्या तरुणीचा ठावठिकाणा मिळाला. त्यांनी तरुणीस तपास करणारे अमोदकर यांचा मोबाईल क्रमांक दिला. अचानक दुसऱ्या दिवशी अमोदकर यांच्या मोबाईलवर त्या तरुणीने प्रियकरासोबत केलेल्या लग्नाचे फोटो टाकले. तिच्या लग्नाची माहिती पालकांनाही समजली. तरुणीच्या लग्नाची शुभ वार्ता समजताच पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
वाढदिवस साजरा करून तरुणी रफूचक्कर
जामनेर जवळच्या एका गावातील तरुणीने १७ वर्षे पूर्ण करताच कुटुंबासोबत केक कापून वाढदिवस साजरा केला अन १८ व्या वर्षात पदार्पण करताच रात्री १ च्या सुमारास कुणाला काहीही न सांगता घर सोडले. पालकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी हरवल्याची नोंद केली असून हवालदार हंसराज वाघ व विलास चव्हाण तपास करीत आहे.
कोरोनाच्या संकट काळात लॉकडाऊन असताना शहर व परिसरातील सुमारे ५०हून जास्त प्रियकर प्रेयसीनं घरून पळून जाऊन लग्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मोबाईलमुळे तरुण तरुणी घरातून पळून जाण्याच्या घटनेत होणारी वाढ चिंताजनक आहे. पालकांनी आपली मुलगी, मुलगा कुणासोबत असतो, यावर लक्ष देणे गरजेचे आहे. वारंवार घडणाऱ्या घटना समाजासाठी चिंतजनक आहे.
- प्रताप इंगळे, पोलीस निरीक्षक