रेल्वेत नोकरीला लावण्यासाठी तरुणीला सात लाखात गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 07:53 PM2020-07-22T19:53:24+5:302020-07-22T19:55:35+5:30
वडील रेल्वेत टी.सी.असून त्यांच्या ओळखीच्या माध्यमातून रेल्वेत नोकरीला लावून देण्यासाठी तरुणाने तरुणीला सात लाख रुपयात गंडविल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी आकाश मनोहर पाटील व त्याचे वडील मनोहर वामन पाटील (रा.वडगाव,ता.रावेर) या दोघांविरुध्द बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव : वडील रेल्वेत टी.सी.असून त्यांच्या ओळखीच्या माध्यमातून रेल्वेत नोकरीला लावून देण्यासाठी तरुणाने तरुणीला सात लाख रुपयात गंडविल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी आकाश मनोहर पाटील व त्याचे वडील मनोहर वामन पाटील (रा.वडगाव,ता.रावेर) या दोघांविरुध्द बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगीता ऋषीकेश खैरनार (रा.सम्राट कॉलनी, जळगाव) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुार, मुलगी वर्षा ही कला शाखेची पदवीधर असून दुसरी मुलगी श्वेता हिचा मित्र आकाश मनोहर पाटील याचे घरी येणे-जाणे होते. त्यामुळे परिवारात चांगले संबंध होते. वर्षा ही नोकरीच्या शोधात असल्याचे पाहून आकाश याने तुझ्या बहिणीला रेल्वेत नोकरीला लावून देतो. माझे वडील भुसावळ विभागात रेल्वेत टी.सी.आहेत असे सांगून नोकरीच्या अर्ज दाखल करण्यासाठी १० हजार रुपये भरावे लागतील असे सांगून आकाश याने श्वेता हिच्याकडून ही रक्कम घेतली. त्यानंतर परत १५ दिवसांनी ५० हजार रुपये लागतील म्हणून तो घरी आला. तेव्हा त्याला ही रक्कम देण्यात आली. त्यानंतर काही ना काही कारण सांगून आॅनलाईन पध्दतीने दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर जानेवारी २०१९ मध्ये आकाश याने वर्षा हिच्या नावाचे नोकरीवर रुजू होण्याचे बनावट पत्र आणले.
दरम्यान, रुजू होण्याच्या आधीच त्या कार्यालयात कोणीतरी फोन करुन उलटसुलट माहिती सांगितल्याचे कारण सांगून त्यासाठी परत ९० हजार रुपये घेतले. ही रक्कम घेण्यासाठी त्याचे वडील मनोहर वामन पाटील हे देखील होते. तेव्हा त्यांनी तुम्ही पूर्ण रक्कम दिली तरच तुमच्या मुलीचे नोकरीचे काम होईल असे आमिष दाखविले व त्यानंतर वेळोवेळी सात लाख रुपये पिता-पूत्रांनी घेतले.
तगादा लावल्यावर लग्नाचे आमिष
इतकी रक्कम दिल्यानंतर नोकरी लागत नसल्याने श्वेताची आई योगीता यांनी तगादा लावला असता अरुण शिंदे हे रेल्वेत मॅनेजमेंट विभागात नोकरीला आहेत, त्यांच्याशी बोलून मी तुमचे काम करतो असे सांगून वेळ मारुन नेली. त्यानंतर श्वेता हिच्यासाठी लग्नाचा प्रस्ताव ठेवून तसे आमिष दाखविले व लग्नासाठी देखील पैशांची मागणी केली. मुलीला नोकरी लागत नसल्याने योगीता खैरनार यांनी पैसे परत मागितले असता आकाश याने तुम्ही मला पैसे मागितले तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करुन घेईल, असा दम भरला. त्यामुळे योगीता खैरनार यांनी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यावरुन पिता-पुत्राविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार आनंदसिंग पाटील व योगेश बारी करीत आहेत.