बिलाच्या मुद्यावरून तरूणांनी घातला गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 11:48 PM2019-12-04T23:48:28+5:302019-12-04T23:49:18+5:30
होमगार्डशी घातली हुज्जत : शहर पोलीस ठाण्यात जमली गर्दी
जळगाव- रेल्वे स्टेशन परिसरातील बिअरबारमध्ये दोन तरूणांनी मद्यप्राशन केल्यावरून बिल देण्यावरून वाद घातला़ त्याठिकाणी होमगार्ड आल्यानंतरही त्याच्याही दोघांनी हुज्जत घालत धिंगाना घातल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडला़ त्यानंतर त्या दोघांना शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते़ विजय सुभाष मोरे (रा़ मानसिंगनगर, पाचोरा) तसेच शांताराम नाना पाटील (रा़ शनिमांडळ) असे दोन्ही तरूणांची नावे आहेत.
विजय मोरे व शांताराम पाटील हे दोघं मित्र बुधवारी सायंकाळी रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलात मद्य प्राशन करण्यासाठी आले होते़ मात्र, त्यानंतर बिल देण्याच्या कारणावरून हॉटेलात वाछ झाला़ यावेळी हॉटेल मालकाने जवळील चौकीत प्रकार सांगितल्यानंतर एक होमगार्ड त्याठिकाणी आला़ मात्र, त्या होमगार्ड सोबत दोघांनी हुज्जत घातली. त्यानंतर आमचा नातेवाईक पोलिसात आहे, असे सांगत पोलीस कर्मचाऱ्यांशीही त्यांनी वाद घातला. काहीवेळानंतर दोघांना शहर पोलिसात आणण्यात आले. पोलीस ठाण्याच्या आवारातही दोघांनी धिंगाणा घातला़ त्यामुळे चांगलीच गर्दी जमली होती़ पोलिसांनी दोघांची विचारपूस केल्यानंतर विजय मोरे याने सांगितले की, आपण दिल्ली येथुन आलो. आपल्या खिशात पैसे होते. परंतु हॉटेलमध्ये कोणी तरी खिशातून पैसे काढुन घेतले. आम्ही मद्यपान केले, कोणाशीही वाद घातला नाही,असे त्यांनी सांगीतले. दरम्यान दोघांचे मोबाईल पोलिसांनी जप्त करून प्रतिबंधात्मक कारवाई केली.