तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानामधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 01:09 PM2019-08-22T13:09:03+5:302019-08-22T13:09:54+5:30
श्रावण म्हणजे व्रत वैकल्पे, श्रावण म्हणजे उपवास -तपास
श्रावण महिना म्हणजे आनंद, उत्साहाची पर्वणीच ! श्रावण म्हणजे हिरवाईच्या वैभवाची लयलूट, श्रावण म्हणजे व्रत वैकल्पे, श्रावण म्हणजे उपवास -तपास, श्रावण म्हणजे धार्मिक ग्रंथाचे श्रवण, श्रावण म्हणजे सणावारांची पुण्यपर्वणी, श्रावण म्हणजे वर्षा सहलींची मेजवानी ! धार्मिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक दृष्टीने तसेच वैज्ञानिक अंगानेही श्रावण हा बारा महिन्यातला अत्यंत महत्वाचा महिना आहे. भगवंताचे खरे दर्शन आपल्याला श्रावणातच होते. म्हणूनच कवयित्री बहिणाबाई सांगतात,
‘तुझ्या पायाची चाहुल लागे पानापानामधी ।
देवा तुझं येनं जानं वारा संगे कानामधी ।।
हिरवकंच वस्त्र लेवून, हिरवा चुडा घालून, हिरवा शालू पांघरून हिरवाईने मंडित झालेली सृष्टी देवता या वैभवाचं दान देणाऱ्या विधात्याच्या स्वागताला या श्रावण महिन्यातच सज्ज झालेली दिसते.या ओळीतून बालकवींनी श्रावणाचे दृश्य रूप आपल्यासमोर उभे केले आहे. ‘श्रावणात घननिळा पासून’, रिमझिम के गीत सावन गाये ’ पर्यंत अनेक कवी व गीतकारांनी श्रावणाचं हे वैभव आपापल्या पद्धतीने वर्णन केलं आहे. प्रेमिकांना श्रावण प्रेमाची महती सांगतो. धार्मिकांना धर्मपारायण करतो, उपासकांना उपासनेचा संदेश देतो. तर कलावंतांच्या प्रतिभेला नवोन्मेषाचे धुमारे फुलवितो. प्रत्येकजण श्रावणाकडे आपल्या नजरेने पाहातो. आपल्या दृष्टीने श्रावणाचे चित्र रेखाटतो, श्रावणाचे गीत गातो. भगवान श्रीकृष्ण कंसाच्या दरबारात जातांना मथुरेतील लोकांनी त्यांचे प्रथम दर्शन घेतले तेव्हा मल्लांना तो मलू वाटला, वृद्धांचा वात्सल्यभाव जागा झाला, तरूणींना त्याचा रूपात मदनाचे रूप दिसले, तर बालकांना तो सवंगडी वाटला तसेच श्रावण महिन्याचे आहे. प्रत्येकाला तो वेगळा वाटत असला तरी श्रावण हा उत्साहाचा आणि उत्सवाचा महिना आहे हे मात्र खरं !
- प्रा. सी.एस.पाटील. धरणगाव.