बोली भाषा जतन करणे आपले काम - प्रा.डॉ. केशव देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:38 AM2019-09-02T00:38:11+5:302019-09-02T00:38:30+5:30
सामान्य जन बोलतात तोपर्यंत मराठी आबाधित राहिल
जळगाव - मराठीचे दिवस वाईट नाहीत, जोपर्यंत सामान्य लोक ती बोलत आहेत, त्यांची जीभ शाबूत आहे. तोपर्यंत मराठी अबाधित राहिल, यासाठी आपली बोली भाषा जतन करणे आणि तिचे संवर्धन करणे सर्वांचीच जबाबदारी आहे, असे मत राज्याच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य प्रा.डॉ. केशव देशमुख (नांदेड) यांनी व्यक्त केले.
चोपडा येथील कवी राजेंद्र पारे यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी ते जळगावात आले होते. त्यावेळी त्यांनी लोकमतशी संवाद साधला.
प्रा. देशमुख हे स्वामी रामानंद तीर्थ मराठावाडा विद्यापीठात मानव विज्ञान शाखेचे डीन आहेत. त्यांनी लिहिलेल्या साहित्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
प्रश्न- भाषा सल्लागार समिती काम काय आहे?
उत्तर- विविध प्रकारचे कोष निर्माण करणे. याशिवाय मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार आणि अमराठी वर्गापर्यंत मराठी भाषा घेऊन जाणे हा भाषा सल्लागार समितीचा उद्देश आहे. यासाठी काही दिवसापूर्वीच या समितीची पहिली बैठक झाली आहे.
प्रश्न- मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी काय प्रयत्न सुरु आहेत?
उत्तर- मूळत: आपल्याकडे विविध बोली भाषा बोलल्या जातात. कथा, कादंबरी, कविता ह्या आता बोलीभाषेत येत आहेत. बोली भाषा जतन करणे हा या समितीचा मूळ उद्देश आहे आणि ती टिकवणे आपले काम आहे.
प्रश्न- एकीकडे मराठीबद्दल आस्था दाखवायची आणि आपल्या मुुलांना मात्र इंग्रजी शाळेत टाकायचे? असे सुरु आहे....त्याबद्दल?
उत्तर - मूळात इंग्रजीशी वैर असण्याचे कारण नाही. मराठी जशी ज्ञानाची भाषा आहे तशी इंग्रजीही आहे . इंग्रजीही जगाला जोडणारी भाषा आहे. मराठी आपली मातृभाषा आहे. ती जतन करणे आणि सांभाळणे आपल्या हाती आहे. यासाठी भाषा सल्लागार समितीच्या माध्यमातून उपयोजित मराठी पुढे यावी, यसाठी प्रयत्न केले जात आहेत.