मारहाणीमुळे तरुणाची आत्महत्या
By Admin | Published: February 25, 2017 12:53 AM2017-02-25T00:53:24+5:302017-02-25T00:53:24+5:30
जळगाव : शहरातील खोटेनगर परिसरातील हिराशिवा कॉलनीतील केदार सुभाष पाटील (२६) या तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली.
जळगाव : शहरातील खोटेनगर परिसरातील हिराशिवा कॉलनीतील केदार सुभाष पाटील (२६) या तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. चारित्र्यावर संशय घेवून दोघा तरूणांनी २२ रोजी केदारला मारहाण व दमदाटी केली होती़ व याच त्रासामुळे केदारने आत्महत्या केल्याचा आरोप त्याचे वडील सुभाष पाटील यांनी केला आहे़
आत्महत्यापूर्व चिठ्ठी वरून शुक्रवारी आक्रमक पावित्रा घेत नातेवाईकासह मित्रपरिवाराने दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली़ यानंतर तालुका पोलिसात गजेंद्र नारायण न्हावी, गौरव युवराज सोनवणे, दोघे रा़हिराशिवा कॉलनी यांच्याविरोधात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे़ सुभाष पाटील यांचे वर्कशॉप आहे़ पत्नी, दोन मुले गौरव व केदार असा त्यांचा परिवार आहे़
काय घडला होता प्रकार ?
गौरव सोनवणे, गजेंद्र न्हावी हे दोघे २२ रोजी केदारच्या घरी आले़ रात्री ९ वाजता फिरण्याच्या बहाना करून केदारला घरातून घेवून गेले़ निमखेडी रोडवरील शेतकी शाळेजवळ घेवून जावून गौरव व गजेंद्रने केदारला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली व त्या महिलेशी संपर्क ठेवू नको़ संपर्क ठेवला तर तुला सोडणार नाही, अशी धमकी गौरवने दिली होती़ रात्री १० वाजता केदारने घरी आल्यावर रडत हा प्रकार कथन केला होता़या प्रकारावरूनच तो चिंतेत होता व त्यातूनच त्याने आत्महत्या केली असल्याचेही, त्याचे वडील सुभाष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे़
गुन्हा दाखल झाल्यावर निघाली अंत्ययात्रा
केदारच्या वडीलासह नातेवाईक व केदारच्या मित्रपरिवाराने शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ताुलका पोलीस स्टेशन गाठले व संशयित दोघा तरूणांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक पावित्रा घेतला़ पोलीस निरिक्षक यांनी नातेवाईकांची समजूत घातली व अखेर दोघाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त व मारहाणीचा गुन्हा दाखल केला़ यानंतर राहत्या घरून केदारची अंत्ययात्रा काढण्यात आली़