मुसळीतील तरुणाने मराठा आरक्षणासाठी केला देहत्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 11:42 PM2018-09-09T23:42:08+5:302018-09-09T23:44:33+5:30
शासनाकडून आरक्षण न मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून संदीप गोविंदा घोलप (२६, रा. मुसळी ता. धरणगाव ) या युवकाने देहत्याग केला. पोळ्याच्या दिवशी ही घटना झाल्याने गावात सर्वत्र सन्नाटा पसरला.
धरणगाव : शासनाकडून आरक्षण न मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून संदीप गोविंदा घोलप (२६, रा. मुसळी ता. धरणगाव ) या युवकाने देहत्याग केला. पोळ्याच्या दिवशी ही घटना झाल्याने गावात सर्वत्र सन्नाटा पसरला.
वडिलांच्या निधनानंतर घरची जबाबदारी मयत संदीप व त्याचा भाऊ विकास वर आली होती. शेतीबाडी नसल्याने संदीपचा भाऊ विकास हा पिंप्री येथील
एका टेलर कडे कामाला जायचा. संदीपने शिक्षण घेतल्यावर नोकरी मिळत नसल्याने आपल्या भावासोबतच टेलरिंग चे काम सुरु केले होते.मात्र तो नेहमी नैराश्येत राहत असल्याचे त्याचा मित्रांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, पाळधी औट पोष्टचे सपोनि जगदीश मोरे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.
विहीरी बाहेर आढळलेली चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. पुढील तपास पाळधी दूरक्षेत्रचे पोलीस कर्मचारी जगदीश मोरे हे करीत आहे.
माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी सकाळी मुसळी येथे संदीपच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी माजी जि.प.सदस्य रवींद्र पाटील, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.नितीन पाटील, युवकचे अध्यक्ष नाटेश्वर पवार, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन पाटील आदी उपस्थित होते.