धावत्या रेल्वेतून पडल्याने परप्रांतीय तरुणाचा मृत्यू; मोबाईल-एटीएम कार्डमुळे पटली ओळख
By विजय.सैतवाल | Published: June 23, 2024 09:26 PM2024-06-23T21:26:57+5:302024-06-23T21:27:25+5:30
पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहेत.
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : धावत्या रेल्वेतून पडल्याने संदीप प्रजापत (२९, रा. सुरजपूर, उत्तरप्रदेश) या परप्रांतीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (२२ जून) रात्री जळगाव ते शिरसोली डाऊन रेल्वे मार्गावर घडली. याप्रकरणी रविवारी (२३ जून) तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरुवातीला अनोळखी म्हणून नोंद असलेल्या या तरुणाची मोबाईल क्रमांक व एटीएम कार्डमुळे ओळख पटली.
जळगाव ते शिरसोली डाऊन रेल्वे मार्गावरील रेल्वे खांबा क्रमांक ४०३/२३ जवळ एका धावत्या रेल्वेतून एक तरुण पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याविषयी शिरसोली रेल्वे स्टेशनचे उपस्टेशन प्रबंधक सौरभकुमार यांनी तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार पोहेकॉ अनिल फेगडे, संजय भालेराव यांच्यासह सहकारी घटनास्थळी पोहचले. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. सुरुवातीला अनोळखी म्हणून नोंद असलेल्या या तरुणाच्या खिशात मोबाईल व एटीएम कार्ड सापडले. मोबाईलच्या कव्हरमध्ये लिहिलेल्या क्रमांकावर पोलिसांनी संपर्क साधला त्या वेळी मयताची ओळख पटली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहेत.