उत्राण येथील युवकाचा गिरणेत बुडून मुत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 08:38 PM2019-10-05T20:38:49+5:302019-10-05T20:38:54+5:30
उत्राण, ता़एरंडोल : बकरीसाठी चारा आणायला गेलेल्या समीर बशिर पिंजारी (वय १६) या युवकाचा गिरणा नदीच्या पात्रात पाय घसरून ...
उत्राण, ता़एरंडोल : बकरीसाठी चारा आणायला गेलेल्या समीर बशिर पिंजारी (वय १६) या युवकाचा गिरणा नदीच्या पात्रात पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाला़ ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.
येथील इंदिरानगर भागात राहणारा समिर पिंजारी हा मुलगा नदीकाठ परिसरात दुपारी तीन वाजेच्या सुमारास बकऱ्यांसाठी चारा शोधायला गेला. त्यावेळी पाय घसरून तो पाण्यात पडला. गिरणेला पूर आलेला असून नदी दुथडी भरून वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहात समिर ओढला जाऊन वाहून गेला़
रात्रभर पोहणाऱ्यांनी त्याचा शोध घेतला. मात्र युवकाचा मृतदेह मिळून न आल्याने सकाळी पुन्हा दत्तू हिम्मत पाटील, मच्छिंद्र विठ्ठल भोई, संभा नाईक, छगन नामदेव भोई हे शोध घेत असताना युवकाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तो ट्यूबच्या साहाय्याने नदीकाठावर आणला. यावेळी येथील पोलीस पाटील राजेंद्र माधव महाजन व हनुमंतखेडेसिम पोलीस पाटील सुनिल देविदास पाटील, शामकांत पाटील यांनी कासोदा पोलीस ठाण्याला कळविले. सहायक पोलीस निरीक्षक पो़ साह़ निरीक्षक रवींद्र जाधव यांनी मृतदेह शवविच्छेदनास कासोदा येथे पाठविले. त्यानंतर मृतदेह परिवाराच्या ताब्यात दिले़