मित्राचा साखरपुडा आटोपून येणा-या जळगावच्या तरुणाला महामार्गावर चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 08:30 PM2017-11-12T20:30:55+5:302017-11-12T20:32:03+5:30
मित्राचा साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून घरी येत असताना समोरील वाहनांना विरुध्द दिशेने ओव्हरटेक करताना दुचाकी घसरल्याने मागून आलेल्या भरधाव आयशर ट्रक खाली चिरडून शेख जावेद शेख गफूर (वय २६, रा.आझाद नगर, मेहरुण, जळगाव) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर शेख अल्ताफ शेख अतीक हा जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजता महामार्गावर मुसळी (ता.धरणगाव) फाट्याजवळ घडली.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, १२: मित्राचा साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून घरी येत असताना समोरील वाहनांना विरुध्द दिशेने ओव्हरटेक करताना दुचाकी घसरल्याने मागून आलेल्या भरधाव आयशर ट्रक खाली चिरडून शेख जावेद शेख गफूर (वय २६, रा.आझाद नगर, मेहरुण, जळगाव) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर शेख अल्ताफ शेख अतीक हा जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजता महामार्गावर मुसळी (ता.धरणगाव) फाट्याजवळ घडली.
याबाबत पाळधी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेख जावेद व शेख अल्ताफ हे दोन्ही जण कासोदा येथून दुचाकीने (क्र.एम.एच.१९ व्ही.आर.७०३३) जळगावला येत असताना मुसळी फाट्याजवळ समोरील वाहनांना विरुध्द दिशेने ओव्हरटेक केल्यानंतर साईडपट्टीवरुन दुचाकी रस्त्यावर चढविताना घसरली व त्याच वेळी मागून आलेल्या कापसाच्या गाठी घेऊन येणा-या आयशर ट्रकने (क्र.एम.एच.१८ बी.ए.०५११) शेख जावेद याला चिरडले तर शेख अल्ताफ यालाही जोरदार धक्का बसला. या अपघातात जावेद हा जागीच गतप्राण झाला.
ट्रक चालकाला घेतले ताब्यात
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पाळधी दूरक्षेत्राचे सहायक निरीक्षक विजय देशमुख व सहका-यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त तरुणांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले तर ट्रक चालक गुलाब महाडीक (रा.मालेगाव, जि.नाशिक) व क्लिनर दिलीप हरीभाऊ मोरे (रा.कळवाडी, ता.मालेगाव) या दोघांना वाहनासह ताब्यात घेतले. ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जावेदचा लाकडाचा व्यवसाय
जावेद हा अविवाहित होता. लाकूड विक्री व मजरी असे दोन्ही कामे तो करत होता. वडील शेख गफूर शेख छोटेमिया हे मजुरी करतात तर मोठा भाऊ मेहमूद हमाली, दुसरा भाऊ वसीम हा मिस्तरी काम तर जुबेर हा चालक आहे. जावेद हा सर्वात लहान होता.आई अरमानबी या गृहीणी आहेत. जावेदच्या मृत्यूची बातमी कळताच मेहरुणमधील लोकांना जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्याच्या मृत्यूने मेहरुणमध्ये शोककळा पसरली आहे.