जळगावात रेड्याच्या हल्ल्यात तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 02:55 PM2018-09-03T14:55:54+5:302018-09-03T14:57:40+5:30
जंगलात चरायला घेऊन गेलेल्या रेड्याने हल्ला करुन मालकालाच ठार केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी सुप्रीम कॉलनीजवळील मेहरुण शिवारातील गायरान जंगलात घडली. गणेश विठ्ठल पवार (वय २५, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरुण,जळगाव) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
जळगाव : जंगलात चरायला घेऊन गेलेल्या रेड्याने हल्ला करुन मालकालाच ठार केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी सुप्रीम कॉलनीजवळील मेहरुण शिवारातील गायरान जंगलात घडली. गणेश विठ्ठल पवार (वय २५, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरुण,जळगाव) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मेहरुणमधील विठ्ठल कोंडू पवार यांच्याकडे १५ म्हशी व १ रेडा आहे. मुलगा गणेश हा रविवारी सकाळी ९ वाजता म्हशी व रेडा घेऊन सुप्रीम कॉलनीजवळील विठ्ठल मंदिर संस्थानच्या गायरान जंगलात चरायला गेला होता. दुपारी ४ वाजता म्हशी व रेडा घरी परत आले, मात्र गणेश परत आला नाही. त्याच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता तोही होत नव्हता. त्यामुळे वडील विठ्ठल पवार हे मुलगा कांतीलाल व प्रमोद यांना घेऊन जंगलात गेले असता झिरा परिसरात नाल्याकाठी गणेश हा मृतावस्थेत दिसून आला.
आतडे निघाले बाहेर
हल्ल्यात गणेश याच्या पोटातील आतडे व मांडीचेही मांस बाहेर आलेले होते, शिवाय अंगावर एकही कपडा नव्हता. गणेशचा मृतदेह पाहताच वडील व दोन्ही भावांनी हंबरडा फोडला. या घटनेची माहिती त्यांनी गावात दिली. दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिरुध्द अढाव, सहायक निरीक्षक समाधान पाटील, उपनिरीक्षक संदीप पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, भरत जेठवे एलसीबीचे शरद भालेराव यांच्यासह मेहरुणमधील नागरिकांना घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.
घटनास्थळावर दोन झाडांची साल निघालेली होती. गणेशवर हल्ला करताना रेडा झाडांना घासला असल्याची शक्यता आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गणेश याच्यावर रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले. दीड वर्षापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. पत्नीचे माहेर धामणगाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी प्रगती, सहा महिन्याची मुलगी मनस्वी, वडील विठ्ठल पवार, आई, आशाबाई, भाऊ कांतीलाल व प्रमोद असा परिवार आहे.