कपिलेश्वर येथे तापी नदीपात्रात युवक बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 01:47 PM2019-03-05T13:47:30+5:302019-03-05T13:48:11+5:30
शोध : महाशिवरात्रीनिमित्त आयोजित यात्रेवर शोककळा
मारवड, ता.अमळनेर : तापी पांझरा संगमावरील निम मुडावद येथे कपिलेश्वर महाशिवरात्री यात्रेस आलेला भाविक युवक तापीपात्रात बुडाल्याची घटना सोमवारी झाली. संध्याकाळी दगडाच्या कपारीखाली तरुणाचा मृतदेह सापडला.
धार, ता.अमळनेर येथील अजय राजेंद्र सैंदाणे (२५) हा येथे तापी पात्रात आंघोळीसाठी उतरला. मात्र दोन-तीन वेळा पाण्यात उडी मारल्याने व त्याठिकाणी खूप खोल डोह असल्याने पाणी पातळीचा अंदाल आला नाही. त्यामुळे तो वर आलाच नाही. त्याच्यासोबत आलेला त्याचा चुलत भाऊ सिद्धार्थ मनोहर सैंदाणे व मित्र गणेश रवींद्र सैंदाणे या दोघांनी काठावरून त्याला आरोळ्या मारल्यानंतर काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी आरडाओरडा केल्यावर तेथे तेथील मच्छिमार व पट्टीचे पोहणारे झंवरलाल नारायण भोई व राजू आनंदा भोई (रा. पिळोदा) यांनी पाण्यात तासभर शोध घेतला. मात्र तो हाती लागला नाही. दरम्यान, मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी त्वरित ध्वनी क्षेपकावरून पोहणाऱ्यांना मदतीचे आवाहन केले असता स्थानिक लोक मदतीला सरसावले.
मयत युवक अजय हा सुरत येथे मेडिसीन कंपनीत कामाला होता. रविवारी तो सुरत येथून कपिलेश्वर यात्रेसाठी आलेला होता. तो दरवर्षी नित्यनेमाने सुरत येथून यात्रेसाठी येत असे. त्यांच्या पश्चात आईवडील व एक लहान भाऊ आहे. सदर घटनेमुळे यात्रा उत्सवावर दु:खाचे सावट पसरले आहे.
दरम्यान, मारवड पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी त्वरित घटनास्थळी हजर झाले. त्यांनी यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी व शोधकायार्साठी तात्पुरती लहान लहान होड्यातील जलवाहतूक ताबडतोब बंद केली.