रेल्वेरुळावर गंभीर जखमी अवस्थेत आढळला तरुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:13 AM2021-01-09T04:13:06+5:302021-01-09T04:13:06+5:30
जळगाव : ममुराबाद रस्त्यावरील स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या रेल्वेरुळावर शुक्रवारी, दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास एक तरुण गंभीर जखमी अवस्थेत आढळून ...
जळगाव : ममुराबाद रस्त्यावरील स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या रेल्वेरुळावर शुक्रवारी, दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास एक तरुण गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला आहे. त्याला हात लावायलादेखील कोणी तयार नव्हते. त्यावेळी तिथून जात असलेल्या एका पत्रकाराने ट्रॅकमॅन आणि नागरिकांच्या मदतीने त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
ममुराबाद रस्त्यावरील स्मशानभूमीशेजारी तरुण रेल्वेरुळावर जखमी अवस्थेत असल्याचे शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता पत्रकार जकी अहमद यांना दिसला. तेथून नागरिक त्याला बघून जा-ये करीत होते. मात्र त्याला हात लावायला कोणी तयार नव्हते. तसेच १०८ रुग्णवाहिकेला कॉल करूनदेखील १५ मिनिटं वाट पाहून अखेर त्याचवेळी जकी यांनी परिसरातील ओळखीच्या नागरिकांना बोलावून व ट्रॅकमन समशेर अली, नवाज अली, अरबाज खान, शोएब अली यांच्या मदतीने रिक्षाचालक तुषार ठाकरे याच्या रिक्षेत जखमी तरुणाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले.
तरुणाची प्रकृती गंभीर
याठिकाणी डॉ. दीपक जाधव, डॉ. उमेश जाधव आणि परिचारिका व कर्मचा-यांनी तत्काळ त्याला ऑक्सिजन लावून उपचार सुरू केले. त्या तरुणाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि पायाला मार लागला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, या तरुणाची उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. घटनेची माहिती मिळताच जीआरपीचे हवालदार रवींद्र ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील महाले यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.