टाकळी खुर्दला निकालानंतर गालबोट; दगडफेकीत तरुणाचा मृत्यू, गावकीच्या राजकारणात तरुणाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2022 05:39 PM2022-12-20T17:39:59+5:302022-12-20T17:40:07+5:30
या घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
- मोहन सारस्वत
जामनेर जि.जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने पराभूत गटाकड़ून देव दर्शनासाठी मंदिराकडे निघालेल्या विजयी उमेदवार व समर्थकांवर जोरदार दगडफेक करण्यात आली. यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना टाकळी खुर्द (ता.जामनेर) येथे मंगळवारी दुपारी घडली.
या घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. धनराज श्रीराम माळी (३२) असे हकनाक बळी गेलेल्या तरुणाचे नाव आहे. टाकळी खुर्द येथे भाजपच्याच दोन गटात लढत झाली. विजयी सरपंच व सदस्यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे निवासस्थानी जाऊन नगराध्यक्ष साधना महाजन यांच्याकडून सत्कार स्वीकारला.
विजयी सरपंच व सदस्य जामनेर येथून टाकळी खुर्द येथे पोहचले. यानंतर गावातील मंदिराकडे दर्शनासाठी जात असताना एका घरातून त्यांचेवर दगडफेक करण्यात आली. अचानक झालेल्या या दगडफेकीने धावपळ सुरु झाली. धनराज श्रीराम माळी (३२) याला डोक्याला दगड लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. उपचार सुरु असतानाचा त्याचा मृत्यू झाला.
धनराज याचे वडीलांचा मृत्यू झाला आहे. त्याच्या पश्चात आई, भाऊ समाधान व दोन बहिणी आहे. तो मोलमजुरी करीत होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण शिंदे सहकाऱ्यांसह टाकळीला पोहचले. घटनास्थळावरुन पोलिसांनी दगड व काही दुचाकी जप्त केल्या.