यावल तालुक्यातील कोळवद येथे विहिरीत पडून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 01:08 AM2018-12-10T01:08:38+5:302018-12-10T01:12:05+5:30
यावल तालुक्यातील कोळवद येथे एका ३५ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. मयताचे नाव भूषण डोंगर फेगडे (रा.सातोद, ता.यावल) असे आहे. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
यावल, जि.जळगाव : तालुक्यातील कोळवद येथे एका ३५ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. मयताचे नाव भूषण डोंगर फेगडे (रा.सातोद, ता.यावल) असे आहे. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
कोळवद गावातील शेतकरी मिठाराम कृष्णा जावळे यांचे कोळवद शिवारातच शेत गट क्रमांंक ३५२ आहे. त्या शेतात विहीर आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास या शेतात सातोद, ता.यावल येथील रहिवासी भूषण डोंगर फेगडे हा तरूण हा गेला होता. तो विहिरीत डोकावत असताना अचानक त्याचा तोल गेला व तो विहिरीत पडून बुडून मरण पावला. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरीकांनी तेथे धाव घेतली तर विहिरीत खूप पाणी असल्याने दोन तासांनंतर फेगडेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याबाबत कोळवद पोलीस पाटील दीपक पाटील यांनी यावल पोलिसांना माहिती दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश खेताळे यांनी ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन केले. फेगडे यांच्यावर सोमवारी सकाळी ९ वाजेला अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.