चपला घालून आंदोलन प्रकरणी युवासेनेचे गोमूत्र दुग्धाभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 04:36 PM2020-08-30T16:36:53+5:302020-08-30T16:38:18+5:30
मंदिरे पूर्ववत सुरू करा यासाठी भाजप नेत्यांनी शनिवारी चपला घालून केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ युवासेनेने रविवारी मुक्ताई मंदिरात अभिषेक करून परिसर स्वच्छ केला
मुक्ताईनगर : मंदिरे पूर्ववत सुरू करा यासाठी भाजप नेत्यांनी शनिवारी चपला घालून केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ युवासेनेने रविवारी मुक्ताई मंदिरात अभिषेक करून परिसर स्वच्छ केला तर आरोप करणाऱ्यांनी किमान मुक्ताईचे दर्शन तरी घ्यावे; तेव्हा वस्तुस्थितीची जाणीव होईल, असा प्रतिटोला खासदार रक्षा खडसे यांनी युवा सेनेला लगावला आहे.
मंदिराचे पावित्र्य अबाधित राहण्यासाठी युवासेनेतर्फे पुरोहितांच्या मंत्रोच्चारात चक्क गोमूत्र व दुग्धाभिषेकाने मंदिराचा गाभारा पवित्र करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख गोपाळ सोनवणे, युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे, तालुका प्रमुख पंकज राणे, शिवसेना उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शहर संघटक वसंत भलभले, शहरप्रमुख गणेश टोंगे, राजेंद्र हिवराळे, गणेश पाटील, प्रकाश गोसावी, चेतन पाटील, दीपक कोळी, रवी दांडगे, शुभम शर्मा, प्रमोद पाटील पुरणाड, राजू तळेले, नामदेव भिल्ल, पप्पू मराठे, आकाश भोई, शुभम तळेले, अमोल भोई, तानाजी पाटील, कृष्णा पाटील, सुनील पाटील तरोडा आदींसह शिवसेना, युवासेना पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.
माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या कार्यकाळात संत मुक्ताई मंदिर व आजूबाजूच्या परिसराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणलेला असून त्या निधीतून मुक्ताई मंदिराचा जीर्णोद्धार व अनेक विकासकामे सुरू आहेत. भाजपतर्फे ज्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले ते ठिकाण हे मंदिराच्या बाजूला नियोजित दुकानाची जागा असून त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. म्हणूनच आरोप करणाºयांनी स्वत: कोथळी येथील संत मुक्ताईचे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा आणि स्वत: खात्री करून घ्यावी, असे आवाहन खासदार रक्षा खडसे यांनी केले आहे.
आरोप करणाºयांनी आमच्या पायातील चपला, बूट न पाहता राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारने जागतिक कोरोना संकट काळात दारूची दुकाने उघडी केलीत, बाजारपेठा उघड्या केल्या, बाजारात प्रचंड गर्दी पहावी आणि भक्तांच्या भावना समजून घेऊन राज्यातील देवस्थाने, मंदिरे सुरू करण्यासाठी कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या सरकारला झोपेतून जागे करावे, असे आवाहन खासदारांनी केले आहे.