बालाजी पेठेतील दोन मजली व्यापारी संकुल जमिनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:11 AM2021-06-30T04:11:12+5:302021-06-30T04:11:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील बालाजी पेठ परिसरातील मुख्य चौकात मनपाच्या जागेवर अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आलेले दुमजली व्यापारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील बालाजी पेठ परिसरातील मुख्य चौकात मनपाच्या जागेवर अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आलेले दुमजली व्यापारी संकुल मंगळवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून जमिनदोस्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान अतिक्रमणधारकांनी व या संकुलातील काही गाळेधारकांनी मनपा कर्मचाऱ्यांशी व उपायुक्त संतोष वाहुळे यांच्याशी हुज्जत घालून कारवाईमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे याठिकाणी तणाव निर्माण झाला होता. तणाव वाढल्यानंतर पोलिसांना पाचारण करून, विरोध करणाऱ्यांना अटक करण्याचा इशारा दिल्यानंतर वाद शांत झाला व मनपाकडून कारवाई पुर्ण करण्यात आली.
बालाजी पेठेतील मुख्य चौकात असलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश मनपा नगररचना विभागाने दिल्यानंतर मंगळवारी सकाळी ११ वाजता मनपाचे पथक याठिकाणी दाखल झाले. मात्र, संबधित गाळेधारकांनी दुकानातून माल व इतर साहित्य बाहेर न काढल्यामुळे मनपा अधिकाऱ्यांनी सर्व साहित्य बाहेर काढण्यास सूचना दिली. मात्र, गाळेधारकांनी मनपा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. त्यामुळे काही काळ कारवाई थांबविण्यात देखील आली. मात्र, पोलिसांनी येवून स्थितीवर नियंत्रण आणले. त्यानंतर गाळेधारकांनीही मार्केटमधील साहित्य बाहेर काढत, सर्व गाळे खाली केले. त्यानंतर मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या जेसीबीकडून सर्व अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.
काय आहे प्रकार
१. शहरातील बालाजी पेठ परिसरातील मुख्य चौकात मनपाच्या मालकीच्या जागेवर गेल्या तीन वर्षांपासून दुमजली इमारत बांधून त्याठिकाणी सहा दुकाने व तळमजल्याचे व्यापारी संकुल तयार करण्यात आले होते. याबाबत विनोद शर्मा नामक व्यक्तीने मनपा नगररचना विभागाकडे तक्रार करून, हे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगितले होते. त्यावर नगररचना विभागाने मोजणी केल्यानंतर हे बांधकाम अनधिकृत असल्याचे स्पष्ट केले.
२. तसेच मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाला आदेश देवून हे बांधकाम पाडण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या. १९ डिसेंबर २०१९ रोजी हे आदेश काढण्यात आले होते. मात्र, तब्बल दोन वर्ष यावर मनपाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तब्बल दोन वर्षांनंतर मनपाकडून मंगळवारी हे बांधकाम जमिनदोस्त करण्यात आले.
मनपा प्रशासनाचा दावा
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार ही जागा मनपा मालकीची असून, यावर भाजीपाला मंडईचे आरक्षण आहे. मात्र, दिलीप लखमल सिखवाल यांनी मनपाची कोणतीही परवानगी न घेता या जागेवर बांधकाम करून घेतले. तसेच याबाबत अनेकवेळा नोटीस देवून देखील हे बांधकाम काढले नाही. तसेच या प्रकरणी न्यायालयाचे देखील मनपाकडे कोणतेही आदेश प्राप्त नसल्याने हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आल्याची माहिती मनपा उपायुक्तांनी दिली. तसेच विकास आराखडा योजनानुसार या परिसरातील इतर जागा देखील मनपाच्या नावावर असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
संकुल बांधकाम करणाऱ्यांचा दावा
या संकुलाचे बांधकाम करणाऱ्या दिलीप सिखवाल यांनी केलेल्या दाव्यानुसार ही जागा आमच्या मालकीची असल्याचे सिखवाल यांनी सांगितले. तसेच १९६४ साली तत्कालीन नगरपालिकेने याठिकाणी भाजीपाला मंडईसाठी आरक्षण टाकले होते. मात्र, ते आरक्षण रद्द झाले असून, मनपाने मोबदला देखील दिलेला नाही. तसेच हे बांधकाम तोडण्यासाठी मनपाने कोणतीही नोटीस आम्हाला बजाविली नाही, केवळ तोंडी आदेश मनपाने दिले असल्याची माहिती दिलीप सिखवाल यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना दिली.