नगरसेवक, प्रशासनाला मॅनेज करण्यासाठी वाॅटरग्रेसमध्ये झंवर यांची ‘एंट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:32 AM2020-12-12T04:32:57+5:302020-12-12T04:32:57+5:30
वॉटरग्रेसचा पहिला टप्पा (ऑगस्ट २०१९ ते फेब्रुवारी २०२०) -७५ कोटींचा मक्ता, महासभेच्या दहा मिनिटेआधी माजी मंत्र्यांच्या फोननंतर मंजूर करण्यात ...
वॉटरग्रेसचा पहिला टप्पा (ऑगस्ट २०१९ ते फेब्रुवारी २०२०)
-७५ कोटींचा मक्ता, महासभेच्या दहा मिनिटेआधी माजी मंत्र्यांच्या फोननंतर मंजूर करण्यात आला.
-७ महिन्यात मनपाने २ कोटी ४७ लाखांच्या बिलांची केली अदायगी
-५० लाखांचा दंड मनपाने केला माफ
-वेतनासाठी १६ वेळा घंटागाडी चालक व सफाई कर्मचाऱ्यांचा संप
-कामाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मनपाने वॉटरग्रेसला बजावल्या ५ नोटिसा
- वॉटरग्रेसच्या कामावरुन गाजल्या ५ महासभा
दुसरा टप्पा (ऑगस्ट २०२० ते नोव्हेंबर २०२०)
- पहिल्या टप्प्यातील विरोधानंतरही मनपाने वॉटरग्रेसला दिली पुन्हा संधी
-मनपातील सर्व नगरसेवकांनी दिला पाठिंबा, महापौरांचा मात्र विरोध
- दोन महासभा झाल्या, एकाही महासभेत वॉटरग्रेसबाबत तक्रारी नाहीत
- राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील यांनी वॉटरग्रेसच्या कामाबाबत पाचवेळा केल्या आयुक्तांकडे तक्रारी.
- ६० नगरसेवकांनी प्रत्येकी १५ हजार रुपये घेतल्याचा पाटील यांचा आरोप, मनपाकडून दखल नाही
- नगरसेवकांकडून दुुसऱ्या टप्प्यात एकही तक्रार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाईसाठी वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आलेला मक्ता हा पहिल्या दिवसापासून चर्चेत असून, आता मक्तेदाराने साई मार्केटिंगला उपठेका दिल्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. याबाबत मनपाकडून चौकशी सुरू असली तरी प्रशासन व नगरसेवकांना मॅनेज करण्यासाठीच वाॅटरग्रेसमध्ये सुनील झंवर यांची एंट्री झाल्याची माहिती मनपातील सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे जुलै २०२० पासून वॉटरग्रेसने काम सुरू केल्यानंतर मनपातील नगरसेवक व प्रशासनाच्या वॉटरग्रेसच्या कामाबाबतच्या तक्रारी कमी झाल्या आहेत.
ऑगस्ट २०१९ पासून वॉटरग्रेस कंपनीने शहराच्या दैनंदिन सफाईच्या कामाला सुरुवात केली; मात्र यामध्ये ठराविक पदाधिकाऱ्यांचा हिस्सा असल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडूनही वॉटरग्रेसच्या कामाबाबत तक्रारी करण्यात येत होत्या. मक्ता सुरू झाल्यानंतर अवघ्या महिनाभरानंतर झालेल्या महासभेत वॉटरग्रेसच्या कामाबाबत सत्ताधारी नगरसेवकांनीच गाऱ्हाणी मांडायला सुरुवात केली होती. त्यानंतर सर्वच पक्षातील नगरसेवकांकडून विरोध वाढल्यानंतर फेब्रुवारी २०२० पासून मनपाने वॉटरग्रेसचे काम थांबविले होते.