कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:14 AM2021-07-17T04:14:27+5:302021-07-17T04:14:27+5:30
आनंद सुरवाडे जळगाव : झिका विषाणूचे केरळात रुग्ण आढळून आल्यानंतर आता कोरोनानंतर या विषाणूचा धोका वाढतोय का, अशी भीती ...
आनंद सुरवाडे
जळगाव : झिका विषाणूचे केरळात रुग्ण आढळून आल्यानंतर आता कोरोनानंतर या विषाणूचा धोका वाढतोय का, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या विषाणूच्या २०१६ मध्ये अधिक केसेस आढळल्या होत्या. स्थानिक पातळीवर सद्य:स्थितीत याचे रुग्ण नसले तरी दक्षता महत्त्वाची असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या विषाणूची लागण ही डासांमार्फत होत असल्याने पावसाळ्यात अधिक काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
झिका विषाणूबाबत तपासणी करण्यासाठी संशयित रुग्णांचे नमुने हे पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान येथे पाठविण्यात येतात, साध्या प्रयोगशाळांमध्ये याची तपासणी होत नाही. ज्या भागांमध्ये अशा लक्षणांबाबत संशय येतो, त्या ठिकाणाहून असे नमुने पुणे येथे पाठविले जातात. दरम्यान, जिल्हाभरात या विषाणूबाबत जनजागृती करण्याच्या सूचना नुकत्याच आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
गर्भवती महिलांना अधिक धोका
झिका विषाणूचा हा गर्भवती महिलांना आणि होणाऱ्या बाळाला अधिक धोका असतो. गर्भवती महिलेला या विषाणूची लागण झाल्यास गर्भवती महिलांना अर्धांगवायूचा झटका यामुळे येऊ शकतो. यासह गर्भात बाळाची वाढ व्यवस्थित होत नाही. त्यामुळे बाळात व्यंग येऊ शकते, ते अपंग जन्माला येऊ शकते. त्यामुळे या गटाला या विषाणूचा सर्वाधिक धोका असतो, असे डॉ. किशोर इंगोले यांनी सांगितले.
झिका कशामुळे होतो?
झिका विषाणू हा क्लेव्ही विषाणूच्या कुटुंबात मोडतो, या विषाणूचा प्रसार हा डासांमार्फत होत असतो. डासांमार्फत होणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकुन गुनिया यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे हा झिका विषाणू असल्याचे सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले यांनी सांगितले. यात लागण झालेल्या लोकांना फ्लूसारखी लक्षणे आढळतात.
झिका विषाणूची लागण झाल्यानंतर लक्षणे
- झिका विषाणूची लागण झाल्यानंतर ताप हे प्रमुख लक्षण असते.
- यानंतर अंगदुखी आणि डेंग्यूसारखीच लक्षणे यात आढळतात.
- तापानंतर सर्दी, खोकला ही सामन्य लक्षणेही यात आढळू शकतात.
- ६० टक्के लोकांना कसलीच लक्षणे आढळत नाहीत, ४० टक्के लोकांना यात लक्षणे आढळतात
उपाययोजना काय?
झिका विषाणू हा केरळमध्ये आढळून आला आहे. अद्याप महाराष्ट्रात याचे रुग्ण नाहीत.
- नियमित सर्वेक्षण, आवश्यक त्या ठिकाणी फवारणी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
- अद्याप जिल्ह्यातून कोणाचेही नमुने पाठविण्यात आलेले नाहीत.
-संशयित रुग्ण आढळून आल्यानंतर त्या ठिकाणी स्वतंत्र सर्व्हे करण्यात येतो.
कोट
आपल्या जिल्ह्यात नियमित सर्वेक्षण तसेच आवश्यक त्या उपाययोजना सुरू आहेत. या विषाणूचे केरळमध्ये रुग्ण आहेत. महाराष्ट्रात याचे रुग्ण नाहीत. - डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक