जिल्हा परिषद शाळांना तीसहून कमी पटसंख्येसाठी अवघे पाच हजार रूपये अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 09:31 PM2019-12-11T21:31:02+5:302019-12-11T21:31:11+5:30
खर्च भागणार कसा? : जिल्ह्यातील १८६५ शाळांना ५ कोटी ५३ लाख ५५ हजार रूपयांचे अनुदान
जळगाव- केंद्र सरकारने सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान यांचे एकत्रीकरण करून अस्तित्वात आणलेल्या समग्र शिक्षण अभियानांतर्गत २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील अनुदानाचे वितरण पटसंख्येनुसार करण्यात आले आहे. यात तीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील तब्बल ३४६ शाळांना अवघे पाच हजार रुपये अनुदान मंजूर करून वितरित केले गेले आहे़ मात्र, वर्षभरासाठी मिळालेल्या पाच हजार रूपयांच्या अनुदानामध्ये वीजबील, शैक्षणिक साहित्य व इमारतीचा खर्च यासाठी लागणारा खर्च भागवायचा कसा असा प्रश्न संबधित शाळांसमोर निर्माण झाला आहे.
समग्र शिक्षा अभियानातून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या या रक्कमेत शाळांनी विद्युत उपकरणांची दुरुस्ती, इमारतींची किरकोळ दुरुस्ती, मैदानाची देखभाल, वीज देयके भरणे, स्वच्छतागृहांची देखभाल, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, उपक्रम राबवणे, विविध अभियाने राबवणे, परसबाग करणे अपेक्षित आहे. मिळणाºया अनुदानातील दहा टक्के रक्कम ही स्वच्छ भारत अभियानासाठी खर्च करणेही बंधनकारक असल्याने केवळ पाच हजार रुपयांमध्ये हे सर्व खर्च कसे भागविणार असा प्रश्न ३० हून कमी पटसंख्या असलेल्या शाळांना पडला आहे. यापूर्वी राज्यातील गतसरकारने कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला विरोध झाल्यानंतर आता या शाळांच्या अनुदानातच कपात करण्याचा घाट घातला गेला असून तीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना २०१९-१० या शैक्षणिक वर्षासाठी अवघे पाच हजार रुपये वार्षिक अनुदान देण्यात आल्याची बाब समोर आली आहे.
१८६५ शाळांना ५ कोटी ५३ लाख ५५ हजारांचे अनुदान
जळगाव जिल्ह्यातील १८६५ शाळांना ५ कोटी ५३ लाख ५५ हजारांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते़ शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियान विभागाकडून हे अनुदान सप्टेंबर महिन्यात शाळांना वितरित करण्यात आले आहे़ दरम्यान, पटसंख्येनुसार अनुदान वितरित केले गेले आहे़
असे आहे पटसंख्येनुसार अनुदान
शासनाकडून पटसंख्येनुसार पाच टप्प्यांमध्ये अनुदानाची वर्गवारी करण्यात आली आहे़ त्यामध्ये ०१ ते ३० पटसंख्या असलेल्या शाळांना ५ हजारांचे अनुदान, तर ३१ ते ६० पटसंख्या असलेल्या शाळांना १० हजार रूपयांचे अनुदान, ६१ ते १०० पटसंख्या शाळांना २५ हजार रूपये, १०१ ते २५० पटसंख्या असलेल्या शाळांना ५० हजार रूपये, तसेच २५१ ते १००० पटसंख्या असलेल्या शाळांना ७५ हजार रूपयांचे अनुदान शासनाकडून देण्यात येत असते़
पटसंख्या शाळा वितरित अनुदान
०१ ते ३० २५१ १४ लाख ४५ हजार
३१ ते ६० ३४६ ४१ लाख १० हजार
६१ ते १०० ४३० १ कोटी ७ लाख ५० हजार
१०१ ते २५० ६४३ ३ कोटी २१ लाख ५० हजार
२५१ ते १००० ९२ ६९ लाख
तालुकानिहाय अनुदानाचे वाटप
अमळनेर - ३४ लाख ५५ हजार
भडगाव - २७ लाख २५ हजार
भुसावळ - २० लाख ५० हजार
बोदवड - १४ लाख ७० हजार
चाळीसगाव - ६८ लाख २५ हजार
चोपडा- ४५ लाख ५५ हजार
धरणगाव - २४ लाख ८५ हजार
एरंडोल- २७ लाख ७० हजार
जळगाव- ३४ लाख ६५ हजार
जामनेर- ६३ लाख ९५ हजार
मुक्ताईनगर - ३० लाख ८० हजार
पाचोरा - ४१ लाख २५ हजार
पारोळा- ३६ लाख ९५ हजार
रावेर - ४७ हजार ६० हजार
यावल - ३५ लाख