जि.प. अध्यक्षपदासाठी भाजपात पाच दावेदार
By admin | Published: February 25, 2017 01:05 AM2017-02-25T01:05:01+5:302017-02-25T01:05:01+5:30
जळगाव : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने या प्रवर्गासाठी आरक्षित पाच गटांमध्ये विजयी झालेल्या महिला सदस्यांची त्यासाठी दावेदारी आहे.
जळगाव : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने या प्रवर्गासाठी आरक्षित पाच गटांमध्ये विजयी झालेल्या महिला सदस्यांची त्यासाठी दावेदारी आहे. दावेदारांमध्ये नंदा अमोल पाटील (केºहाळा), ज्योती राकेश पाटील (वडगाव), माधुरी चंद्रशेखर अत्तरदे (साळवा), कल्पना राजेश पाटील (शहापूर), रंजना प्रल्हाद पाटील (मोरगाव) यांचा समावेश आहे.
अध्यक्षपदाच्या दोन दावेदार सदस्या रावेरातच आहेत. त्यात नंदा पाटील व रंजना पाटील यांचा समावेश आहे. त्यात कोण बाजी मारते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
कोण आहेत नंदा पाटील?
नंदा पाटील या पाल-केºहाळा गटात प्रथमच जि.प.ची निवडणूक लढवून विजयी झाल्या. त्या उच्चशिक्षित असून, त्यांचे पती अमोल पाटील हे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे ते उपाध्यक्ष आहे. नंदा पाटील या गावातील महिला मंडळाच्या अध्यक्ष असून, त्यांचे सासरे शशिकांत पाटील हे केºहाळा येथील सरपंच, पं.स.चे सदस्य होते. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. पाल गट हा रावेर विधानसभा मतदारसंघात आहे. रावेर विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या पाच जागा निवडून आल्या आहे. आमदार हरिभाऊ जावळे व भाजपाचे नेते सुरेश धनके आपल्या भागात भाजपाला घवघवीत यश मिळाल्याच्या बळावर नंदा पाटील यांना अध्यक्षपद मिळावे यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मागणी करू शकतात. यात नंदा पाटील या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जवळच्या नातेवाईक असल्याची माहिती मिळाली.
मोरगावच्या रंजना पाटील
मोरगाव, ता.रावेर येथील रंजना प्रल्हाद पाटील या ऐनपूर-खिरवड गटातून निवडून आल्या आहे. त्यांचे पती प्रल्हाद पाटील हे भाजपाचे जुने कार्यकर्ते आहे. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय असून, प्रथमच त्यांना जि.प.सदस्य होण्याचा मान मिळाला. ऐनपूर-खिरवड हा जि.प.चा अर्धा गट मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात आहे, तर अर्धा गट रावेर मतदारसंघात आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे व आमदार हरिभाऊ जावळे यांची भूमिका याबाबत महत्त्वाची असणार आहे.
साळवा येथील माधुरी अत्तरदे
माधुरी चंद्रशेखर अत्तरदे यादेखील प्रथमच जि.प.सदस्य झाल्या आहे. त्यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे हे बांधकाम व्यावसायिक असून, भुसावळात ते भाजपाचे नगरसेवकही आहे. भाजपात लेवा समाजातील त्या एकमेव महिला सदस्या आहेत. साळवा- बांभोरी या गटातून त्या चांगले मताधिक्य घेऊन निवडून आल्या आहेत. त्यांचा गट जळगाव ग्रामीण मतदारसंघात असून, भाजपाचे या मतदारसंघातील नेते पी.सी.पाटील व इतर त्यांना अध्यक्षपदाचा मान मिळवून देण्यासंबंधीची भूमिका बजावू शकतात.
वडगावच्या ज्योती पाटील
वडगाव, ता.चोपडा येथील ज्योती राकेश पाटील यादेखील उच्चशिक्षित आहे. वर्डी-गोरगावले गटात त्या प्रथमच निवडून आल्या आहे. त्यांचे सासरे शांताराम भाऊलाल पाटील हे जि.प.चे सदस्य होते. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. चोपडा तालुक्यात भाजपाला तीन जागा मिळाल्या. चोपड्यात भाजपाला प्रथमच एवढे यश मिळाले आहे. पण प्रबळ नेतृत्व चोपड्यात नसल्याने श्रेष्ठींकडे पाठपुराव्याचा मुद्दाही आहे.
शहापूर येथील कल्पना पाटील
शहापूर-देऊळगाव गटातील कल्पना राजेश पाटील या प्रथमच जि.प. सदस्य झाल्या असून, त्यांचे पती राजेश पाटील हे शेती करतात व सध्या बाजार समितीचे संचालक आहे. यापूर्वी राजेश पाटील व कल्पना पाटील यांनी काँग्रेसकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविल्या; पण त्यांना अपयश आले होते. २०१२ च्या पंचवार्षिकमध्ये जामनेरमधील दिलीप खोडपे व प्रयाग कोळी यांना अध्यक्षपदाचा मान मिळाला.
या वेळेस जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून कल्पना पाटील यांच्या रूपाने पुन्हा जामनेरलाच अध्यक्षपदाचा मान मिळतो का हादेखील मुद्दा आहे.
अध्यक्षपदासाठी काही सदस्यांनी आपल्या नेत्यांच्या भेटीगाठीही सुरू केल्या आहेत.
जि.प.अध्यक्षपदाबाबत पक्षातील वरिष्ठ नेते, सर्व प्रतिनिधी, ज्येष्ठ यांच्याशी चर्चा झाल्यानंतर निर्णय घेतला जाईल. अध्यक्षपदाचे नाव अजून निश्चित झालेले नाही. त्याबाबत लवकरच बैठक घेतली जाईल. बैठकीत जे नाव निश्चित होईल त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळेल.
-गिरीश महाजन, जलसंपदामंत्री
अध्यक्ष निवड २० मार्च रोजी शक्य
जि.प.च्या २०१२ च्या पंचवार्षिकची मुदत येत्या २१ मार्च रोजी संपत आहे. यापूर्वी जि.प.मध्ये अध्यक्ष निवड करावी लागेल. २०१२च्या पंचवार्षिकमध्ये २० मार्च रोजी अध्यक्ष निवड झाली होती. ही बाब लक्षात घेता या वेळेसही म्हणजेच २०१७च्या पंचवार्षिकमध्ये अध्यक्षपदाची निवडदेखील २० मार्च रोजी होऊ शकते. त्याबाबतचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगातर्फे जाहीर केला जाईल.