गाते येथील जि.प. प्राथमिक शाळेतील शिक्षिका निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 10:09 PM2019-11-17T22:09:06+5:302019-11-17T22:14:51+5:30
कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गाते जि.प. प्राथमिक शाळेतील शिक्षक पदावरून कमल गोविंदा ढाके यांना निलंबित करीत असल्याचे आदेश जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन. पाटील यांनी पारीत केले आहेत.
रावेर, जि.जळगाव : गुजर वा गुजराती मातृभाषेवर आधारित एकही शाळा अस्तित्वात नसताना तथा शाळा सोडल्याचा दाखला वा जनरल रजिस्टरमधील नमुना नंबर १ वर गुजर मातृभाषेचा उल्लेख नसताना तांदलवाडी माध्यमिक शाळा शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त व संचालकांना विनातारखेचा निर्गमन उतारा देताना बेकायदेशीरपणे क्रमांक सहाच्या रकान्यात मराठी ऐवजी गुजर मातृभाषा असल्याचा उल्लेख केला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कमल गोविंदा ढाके यांना गाते जि.प. प्राथमिक शाळेतील शिक्षक पदावरून जि.प.सेवेतून निलंबित करीत असल्याचे आदेश ३१ आॅक्टोबर रोजी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन. पाटील यांनी पारीत केले आहेत. या निर्गमन उताऱ्याचा उपयोग जातपडताळणीसाठी केला जातो.
याबाबत वृत्त असे की, रावेर तालुक्यातील गाते जि.प. प्राथमिक शाळेत शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या कमल गोविंदा ढाके या तांदलवाडी जि.प. केंद्रशाळेत प्रभारी मुख्याध्यापक पदावर यापूर्वी कार्यरत होत्या. त्या सेवा कालावधीत त्यांनी तांदलवाडी माध्यमिक शाळा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक व विश्वस्त श्रीराम भिका पाटील, जीवराम कृष्णा पाटील, बाबू काशिनाथ पाटील, मुकेश दशरथ पाटील, केशव गोविंदा महाजन व माजी आमदार राजाराम गणू महाजन, भागवत गेडू महाजन या सात सदस्यांना मोठा घोटाळा करून गुजर मातृभाषा असल्याचा बेकायदेशीर उल्लेख करून शाळा निर्गमनाचा दाखला दिल्याने त्यांच्याविरूध्द शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी तक्रार बहुजन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संसदेचे जिल्हाध्यक्ष शुद्धोधन लालचंद सोनवणे यांनी जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली होती.
त्यानुसार गटशिक्षणाधिकारी व्ही.एस.पवार यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात तालुक्यात गुजर वा गुजराती माध्यमाच्या प्राथमिक शाळा अस्तित्वात नसताना वा संबंधितांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यासह नमुना नंबर एकवर कुठेही गुजर मातृभाषा असल्याचा उल्लेख नव्हता. असे असताना तत्कालीन प्रभारी मुख्याध्यापिका कमल गोविंदा ढाके यांनी शाळा निर्गमन उताºयातील रकाना नंबर ६ मध्ये मराठीऐवजी गुजर मातृभाषेचा उल्लेख करून सदरचा निर्गमन दाखला दिला असल्याचे नमूद केले आहे. किंबहुना त्यांचे हे वर्तन शिस्तभंग करणारे, असभ्य, अशोभनीय व कर्तव्यात कसूर करणारे असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्या अनुषंगाने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन. पाटील यांनी गाते जि.प. शाळेतील उपशिक्षिका कमल गोविंदा ढाके यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ अन्वये महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हासेवा (वर्तणक) नियम १९६७ मधील ३ चा भंग करून गैरशिस्तीचे वर्तन व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांना जि.प. सेवेतील प्राथमिक उपशिक्षक पदावरून निलंबित करीत असल्याचे आदेश पारीत केले आहेत.