जि.प.चा टंचाई आराखडा फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:10 PM2020-01-16T12:10:45+5:302020-01-16T12:11:20+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; १३ लाखांचाच आराखडा सादर
सुशील देवकर
जळगाव : जि.प.ने २०१९-२० साठी केवळ १८ गावांना १८ विशेष नळपाणी योजना दुरूस्ती योजनांची तरतूद असलेला अवघ्या १३ लाखांचा टंचाई आराखडा सादर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हा आराखडा सोमवारीच जिल्हाधिकाऱ्यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे परत पाठविला असून संभाव्य टंचाईचा फेरआढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणाºया पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हापरिषदेकडून संभाव्य टंचाईवरील उपाययोजनांचा आराखडा मागविला जातो. त्यास जिल्हाधिकाºयांकडून मंजुरी देऊन टंचाई विभागाच्या नियंत्रणाखाली या आराखड्याची अंमलबजावणी केली जात असते. मागील वर्षी जिल्ह्यात गत १५ वर्षातील तीव्र दुष्काळ होता. त्यामुळे तब्बल २२१ टँकर द्वारे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा झालेल्या अतिवृष्टी व सरासरीपेक्षा दीडपट पावसामुळे टँकरच्या संख्येत घट होणार असल्याचा अंदाज होता. मात्र आराखड्यात टँकरसाठी काहीच तरतूद केलेली नाहीे.
फक्त १८ गावांसाठी १८ उपाययोजना
प्रारंभी आराखडा सुमारे २कोटी १२ लाखांचा होता. त्यात २९१ गावांचा समावेश करून सुमारे ३५६ टंचाई उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या. मात्र जि.प.ने प्रत्यक्षात जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेल्या १३ लाख ९० हजारांच्या टंचाई आराखड्यात केवळ अमळनेर व पारोळा या दोन तालुक्यात १८ गावांमधील १८ विशेष नळपाणी योजना दुरुस्तीच्या प्रस्तावांचाच समावेश आहे. त्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा, विहीर अधिग्रहण,आदी इतर कोणत्याही उपाययोजनांचा समावेश नाही. जिल्ह्णात जरी अतिवृष्टी झालेली असली तरीही अनेक तालुक्यांमधील काही ठरावीक भागात उन्हाळ्यात दरवर्षीच पाणीटंचाई जाणवत असते. मात्र त्याचा अंदाज न घेताच जि.प.ने टंचाई आराखडा सादर केल्याने जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी हा आराखडा जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे परत पाठविला आहे.