‘आरटीओ’तील झोल : अबब.... खटला विभागातून २ ते ५ लाख रुपये किंमतीचे ७२ तपासणी मेमो गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 12:43 PM2020-02-07T12:43:25+5:302020-02-07T12:44:00+5:30
वरिष्ठ कार्यालयाला लेखापरिक्षण करण्याची शिफारस
जळगाव : आरटीओ कार्यालयात ई-चलन प्रणालीतील घोळाचे नवनवीन किस्से समोर येत असून सप्टेंबर २०१९ मध्ये ई-चलन प्रणालीचे निरीक्षण केले असता खटला विभागात निरीक्षकांनी मोहीमेदरम्यान रस्त्यावर केलेल्या कारवाईचे कार्यालयीन अभिलेख व तपासणीच्या ७२ मेमोंची तफावत आढळून आलेली आहे. या मेमोंची किंमत २ ते ५ लाखाच्या घरात असू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
रोखपाल तथा कनिष्ठ लिपीक नागेश पाटील यांनी सप्टेंबर २०१९ या महिन्याच्या कालावधीत शासकीय कामकाज करताना सरकारी महसुलाची हानी व अनियमितता केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
त्यामुळे ते शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र असून त्यांनी केलेल्या अनियमिततेची सखोल चौकशी करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयातील पथकामार्फत सखोल लेखापरिक्षण करण्यात यावे अशी विनंती व पत्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी परिवहन आयुक्तांना पाठविले आहे.
या निरीक्षकांच्या मेमोत तफावत
सप्टेंबर २०१९ रोजी मोटार वाहन निरीक्षक श्रीकांत महाजन यांनी ६० आॅनलाईन मेमो दिले आहेत.
प्रत्यक्षात त्यांच्या नावावर फक्त ५३ अभिलेखाची (मेमो) खटला विभागात नोंद आहे, त्यांच्या ७ मेमोची तफावत आहे. सहायक मोटार वाहन निरीक्षक राकेश शिरसाठ यांनीही १४० मेमो दिलेले असून त्यांच्या नावासमोर फक्त १०९ मेमोंची संख्या आहे, त्यात देखील ३१ मेमोंची तफावत आहे. संदीप शिंदे यांनी २८ मेमो दिले आहेत, तर त्यांच्या नावावर २२ ची नोंद आहे.
त्याशिवाय दीपक साळुंखे, प्रशांत कंकरेज, रणजीत पाटील, सुनील गोसावी, विशाल मोरे व उमेश तायडे या सहायक निरीक्षकांच्या मेमोतही तफावत असून हा आकडा ७२ वर आहे.
त्याचे अंदाजे शुल्क लाखो रुपयांच्यावर आहे.एका अवजड वाहनाचे शुल्क २५ हजाराच्या जवळपास आहे, त्याशिवाय कर, दंड, विमा, फिटनेस आदी प्रकाराचे मेमो आहेत.
राष्टÑवादीने घेतली लोकमत वृत्ताची दखल
आरटीओतील घोळाबाबत लोकमतमध्ये प्रकाशित होत असलेल्या वृत्ताची राष्टÑवादी कॉँग्रेस पक्ष महानगर शाखेने दखल घेत गुरुवारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांची भेट घेऊन नागेश पाटील यांनी सरकारी पैशाचा अपहार केला असल्याने त्यांच्याविरुध्द सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनीच फिर्याद द्यावी अशी मागणी केली, तसेच या प्रकरणात वरदहस्त कोण?, त्याचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी करुन परिवहन मंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, अॅड.कुणाल पवार, स्वप्नील नेमाडे, गौरव वाणी, चंद्रकांत चौधरी, सुशील शिंदे व इम्रान शेख यावेळी उपस्थित होते.