जि.प. सभेत कामे मंजुरीवरुन गदारोळ : सत्ताधारी व विरोधकांमध्ये घमासान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:20 PM2018-07-26T12:20:39+5:302018-07-26T12:23:23+5:30
बुरशीयुक्त शेवयाप्रकरणी ठेकेदाराचा पुरवठा खंडित करणार
जळगाव : कामे मंजुरीच्या विषयावरुन सत्ताधारी भाजपा आणि विरोधक शिवसेना सदस्यांमध्ये जोरदार घमासान झाले. तर बुरशीयुक्त शेवयाप्रकरणी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. या दोन विषयांवरुन जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार गदारोळ झाला. शेवयाप्रकरणी तर काही सदस्यांनी थेट राजीनाम्याचा दम भरल्यावर ‘त्या’ पुरवठादाराचा पुरवठा खंडीत करण्याबाबतची नोटीस देण्याचा निर्णय सभेत झाला.
ही सभा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी शाहू महाराज सभागृहात पार पडली. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती पोपटराव भोळे, प्रभाकर सोनवणे, दिलीप पाटील व रजनी चव्हाण या पदाधिकाºयांसह मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, सभेचे सचिव तथा सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. अकलाडे यांची मुख्य उपस्थिती होती. दुपारी दोन ते सायंकाळी साडेसात अशी तब्बल साडेपाच तास चाललेल्या या सभेत विविध १८ विषय मंजूर करण्यात आले.
कामे मंजुरीचा आयत्या वेळेचा विषय ठेवावा लागला बाजुला
डीपीडीसीच्या निधीतून करावयाच्या कामांची यादी न ठेवता हा विषय आयत्यावेळी मांडून मंजुरीचा प्रयत्न सत्ताधारी गटाने केला. यावेळी शिवेसना सदस्य नानाभाऊ महाजन, गटनेते रावसाहेब पाटील यांच्यासह सेनेच्या सर्व सदस्यांनी कडाडून विरोध केला. ५० लाखाच्यावरील कामे सर्वसाधारण सभेत मंजुरीची आवश्यकता असते.
यासाठी कामांच्या याद्याही ठेवणे गरजेचे असे. मात्र याद्या न ठेवता नंतर कामे एकत्र बसून ठरवू तसेच अध्यक्षांना कामे मंजुरीचा अधिकार देवू असे दोन प्रस्ताव सत्ताधाºयांनी दिले. मात्र विरोधकांनी ते मान्य न केल्याने सत्ताधारी गटाने बहुमताने ठराव मंजुर करु अशी भूमिका घेतली. यावर सर्वसाधारण सभेत आयत्यावेळेच्या विषयात आर्थिक विषय घ्यायचे नाहीत असा मागील ठराव असताना हा विषय मंजूर करणे नियमबाह्य ठरेल, असा मद्दा नानाभाऊ महाजन यांनी मांडत कोर्टात जाण्याचाही इशारा दिल्यावर हा विषय बाजुला ठेवून इतर विषय घेण्यात आले. आरोग्य आणि शिक्षण विभागातील खर्चाचे विषय आयत्यावेळेच्या विषयात सादर केले होते. त्यास विरोधी गटाने विरोध नोंदवला. तसेच निधीचे समान वाटप व्हावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी जोरदार शाब्दीक चकमकमही उडाली.
शेवया प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे पुन्हा आश्वासन
गेल्या सभेत बुरशीयुक्त शेवया प्रकरणी आश्वासन देवूनही गुन्हा का दाखल होवू शकला नाही? याचा जाब थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विचारण्यात आला. यावेळी आयुक्त आणि पुरवठादार यांच्यात हा करार झाल्यामुळे आयुक्तांची परवानगी आवश्यक असल्याने त्यांच्याकडे तसा प्रस्ताव पाठविला आहे, अशी माहिती दिवेकर यांनी दिली. मात्र सर्वसाधारण सभेत गुन्हा दाखल करण्याचा ठराव झाला असून या सभेतील ठरावास काहीच अर्थ नाही का? असा प्रश्नही सदस्यांनी उपस्थित केला. सभेला अर्थ नसेल तर आम्ही राजीनामे देवू, असे नानाभाऊ महाजन यांनी ठणकावले तर निकृष्ट आहारामुळे मुले मेल्यावर गुन्हा दाखल होईल का? असा सवाल रावसाहेब पाटील व शशिकांत साळुंखे आदींनी केला. यानंतर मात्र पुरवठादाराचा पुरवठा खंडीत करण्याबाबत सात दिवसांची नोटीस देवून आयुक्तांना तसे कळविण्यात येईल व नवीन पुरवठादाराची मागणी केली जाईल. यासह सभेच्या ठरावाची प्रत प्राप्त झाल्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल केला जाईल, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.
काटे यांनी दिला महाजन यांना घरचा आहेर
सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. नाईक यांच्याबद्दलच्या तक्रारीवरुन त्यांना कार्यमुक्त करावे, असा ठराव गेल्या सभेत झाला होता. याची अंमलबजावणी न झाल्याने हा मुद्दाही सभेत गाजला. यावेळी भाजपा गटनेते मधु काटे यांनी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांना सवाल केला की, गेल्या वेळी तुम्ही नाईक प्रश्नी आक्रमक होते मात्र आता गप्प का? यावर महाजन यांंनी सांगितले की, आपण माहिती घेतली असून यासंदर्भात प्रशासकीय अडचणी असल्याने आपण बोलत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांंनी सिंचन विभागाच्या सचिवांना हा प्रस्ताव पाठविला असून आल्याकडे अभियंता नसल्याने पर्यायी अभियंता मिळाल्यावर त्यांना कार्यमुक्त केले जाईल, असे स्पष्ट केले.
दरम्यान तोपर्यंत नाईक यांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी सदस्यांनी केली परंतु पर्यायी अभियंते नसल्याचीच अडचण यावेळी सांगण्यात आली. दरम्यान उपाध्यक्ष महाजन यांची नेहमीची सभेतील कमांड न दिसल्याने विरोधकही अधिक हावी झाल्याचे दिसून आले.
सभागृहात मद्यपीने केला प्रवेश
सभेत चर्चा रंगली असतानाच एका मद्यपीने सभागृहात प्रवेश केला. हे पाहून सदस्य नानाभाऊ महाजन यांनी जि. प. च्या सुरक्षा व्यवस्थेबाबतच सवाल व्यक्त केला. कोणीही जि.प. त घुसत असले तर येथे सुरक्षा व्यवस्था आहे की नाही? उद्या अतिरेकी घुसतील... याबाबत बंदोबस्त होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. दरम्यान लगेचच या मद्यपीस सभगृहाबाहेर काढण्यात आले.
नीलम पाटील यांनी दाखविले कालबाह्य हळदीचे पाकीट
सदस्य प्रा. डॉ. नीलम पाटील यांनी चहार्डी गटातील पोषण आहाराबाबत तक्रार केली. यावेळी त्यांनी मुदत संपलेली हळदीची पाकिटे वाटप झाल्याचे निदर्शनास आणून दिले व हे पाकीटही सभागृहात दाखविले. याचबरोबर प्रत्येक गोणीत सुमारे तीन किलो तांदूळ दिला जात असून हा तांदूळही अत्यंत खराब दर्जाचा असल्याचे सांगितले. यावर चैकशीचे आश्वासन देण्यात आले.
‘त्या’ शेवयांची जप्त केलेली पाकिटेही गायब
४बुरशीयुक्त शेवया प्रकरणात महिला व बालविकास अधिकारी आर. आर. तडवी यांंना सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले. तीन महिन्यापासून याप्रकरणात अद्यापपर्यंत काय कारवाई झाली ? याबाबत प्रश्नांची सरबत्ती सदस्यांनी केली. त्यावेळी जप्त केलेली पाकिटेही सांभाळली गेली नाही. तसेच पुरवठादारास दंडही ठोठावला नाही व नोटीसही दिली गेली नाही, आदी गंभीर बाबी पुढे आल्या. कोणतीही कार्यवाही का झाली नाही? झारीतील शुक्राचार्य कोण? असा सवालही व्यक्त झाला.
मराठा आरक्षणाचा ठराव मंजूर
मराठा समाजाच्या आंदोलनात बळी गेलेल्या काकासाहेब शिंदे यांना सभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात येवून मराठा समाजास आरक्षण मिळावे हा रवींद्र पाटील यांनी मांडलेला ठराव सर्वानुमते मंजूर झाला. शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील व राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे यांंनी अनुमोदन दिले.
प्रशासनाच्या सुस्तपणामुळे अनेक गैरव्यहार होवूनही कार्यवाही नाही !
गेल्या सभेत बुरशीयुक्त शेवयाप्रकरणी दोन दिवसात गुन्हा दाखल करण्याचा शब्द मुख्य कार्यकारी अधिकारी दिवेकर यांनी दिला होता. मात्र महिना उलटूनही गुन्हा दाखल होवू शकला नाही. पोषण आहाराचा विषयही असाच मागे पडला. यावरुन सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्वच सदस्यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. गेल्या अनेक वर्षात अनेक गैरव्यवहार झालेत परंतु प्रशासनाच्या अनास्थेमुळे व सुस्तपणामुळे कोणत्याच प्रकरणात काहीही कार्यवाही झालेली नाही, असा संतप्त सूर यावेळी उमटला. जि.प. सदस्य प्रभाकर सोनवणे, रावासाहेब पाटील, नानाभाऊ महाजन, शशिकांत साळुंखे, प्रताप पाटील, मधु काटे, पल्लवी सावकारे, माधुरी अत्तरदे, यांचेसह स्वत: उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी हा विषय उचलून धरला.
एस. टी. नुसार अंतर ग्राह्य धरणार
बदली प्रक्रियेत काही शिक्षकांनी शाळांचे अंतर चुकीचे दिल्याच्या तक्रारींवरुन हे अंतर गुगल नुसार ग्राह्य धरले जाणार होते मात्र सदस्या पल्लवी सावकारे यांंनी गुगलचे अंतर शॉर्टकटही असते. एस. टी. बसनुसार इतर जि. प.ने अंतर ग्राह्य धरले असून आपणही तेच मान्य करावे, ही त्यांची मागणी मान्य करण्यात आली.
जामनेरच्या बीडीओला धरले धारेवर
जामनेर तालुक्यातील भारूडखेडा येथील शेतकºयाकडे विहीरीसाठी ५० हजार रूपयांची मागणी करणाºया जामनेर येथील बीडीओंच्या चौकशीचे आदेश रोहयो मंत्री जयकुमार रावळ यांनी दिले आहेत. यासंदर्भात नानाभाऊ महाजन, रावसाहेब पाटील, मधुकर काटे, प्रभाकर सोनवणे, पल्लवी सावकारे, गजेंद्र सोनवणे, माधुरी अत्तरदे यांनी जामनेरचे बीडीओ ए बी जोशी यांना सभेत धारेवर धरले. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी देखील प्रशासनाकडे विचारणा केली. मुख्य कार्यकारी अधिकारी दिवेकर यांनी यासंदर्भात कारवाईचे आश्वासन देत पावसाळ्या संपल्यानंतर या विहीरीचा कार्यरंभ आदेश देणार असल्याचे यावेळी सांगितले. या प्रकारणात जामनेर बीडीओ जोशी यांच्यासह पाचोरा येथील शाखा अभियंता निकम यांच्या मुजोरगिरीला वरिष्ठ अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप काटे यांनी केला.