धरणगाव तहसिलदारावरील कारवाईसाठी जि.प.सदस्यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:17 AM2021-05-07T04:17:12+5:302021-05-07T04:17:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा परिषदेच्या सदस्या माधुरी चंद्रशेखर अत्तरदे यांनी गुरूवारी धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे हे मनमानी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेच्या सदस्या माधुरी चंद्रशेखर अत्तरदे यांनी गुरूवारी धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे हे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी तहसिलदारांवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली. त्यानंतर अत्तरदे यांनी उपोषण मागे घेतले आहे.
धरणगावचे तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्याविरोधात समस्त तलाठी संघटना, धरणगाव तालुका यांनी देखील याबाबत २० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी राऊत यांना निवेदन दिले होते. तसेच नांदेड गटाच्या जि.प. सदस्य माधुरी चंद्रशेखर अत्तरदे यांनी देखील याबाबत विविध निवेदने दिली होती. मात्र त्यावर कार्यवाही होत नसल्याने गुरूवारी सकाळी जि.प. सदस्या अत्तरदे या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही वेळ उपोषणाला बसल्या होत्या. मात्र ५ मे रोजीच याबाबत जिल्हाधिकारी राऊत यांनी चौकशी समिती स्थापन केलेली असल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले. तसेच १५ मे पर्यंत योग्य ती कार्यवाही न झाल्यास पुन्हा १६ मे पासून उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्हा पुर्नवसन अधिकारी एस.आर.भारदे यांच्या अध्यक्षतेत जिल्हा खनिकर्म अधिकारी आणि सहा. पुरवठा अधिकारी यांची समिती स्थापन केली आहे
देवरे हे तालुक्यात मनमानी कारभार करत असल्याचा आरोप अत्तरदे यांनी केला आहे. तसेच धरणगाव तालुक्यातील तलाठी संघटनेने देखील तहसिलदारांची महसुल कर्मचाऱ्यांशी वर्तणुक अयोग्य असल्याचे म्हटले होते. महसुल शाखेचे तहसीलदार पंकज लोखंडे यांनी देखील याबाबत अत्तरदे यांना पत्र देत उपोषणापासून परावृत्त होण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी उपोषण मागे घेतले आहेत.