जि.प.च्या ५९ शाळा मोबाइल डिजिटल
By admin | Published: March 23, 2017 12:15 AM2017-03-23T00:15:07+5:302017-03-23T00:15:07+5:30
एरंडोल : खडू व फळ्याची जागा घेतली आता टॅब व प्रोजेक्टरने, विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद
एरंडोल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये ‘खडू व फळा’ या संकल्पनेची जागा आता टॅब व प्रोजेक्टरद्वारे अध्यापन पद्धतीने घेतलेली दिसून येते. या नव्या तंत्रामुळे शिक्षण व अध्ययन आनंददायी झाले आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची संख्या ८४ आहे. त्यापैकी २५ शाळा डिजिटल झाल्या असून, ५९ शाळा मोबाइल डिजिटल आहेत.
प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमांतर्गत १०० टक्के शाळा प्रगत होणे आवश्यक आहे. त्यासाठी अध्यापनाच्या पद्धतीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळा डिजिटल होणे व अध्यापनामध्ये ई-लर्निंगचा वापर करणे गरजेचे आहे. यासाठी गटशिक्षणाधिकारी एन.एफ. चौधरी, त्यांचे सहकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास पाटील यांच्यासह शिक्षकांनी चंग बांधला आहे.
एरंडोल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक संख्या ३६६ असून, त्यापैकी ४५ शिक्षक तंत्रस्रेही झाले आहेत. उर्वरित शिक्षकांसाठी तालुकास्तरावर प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
डिजिटल शाळांमध्ये संगणक ई- लर्निंग साहित्य, स्मार्ट टी.व्ही., टॅबलेट, प्रोजेक्टर इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. त्यांचा वापर अध्यापनासाठी होत आहे. गुणवत्तावाढीसाठी ई-लर्निंगचा वापर झाला आहे. ४५ शिक्षकांनी तंत्रस्रेही प्रशिक्षण घेऊन अध्यापनात नवतंत्र ज्ञानाचा वापर सुरू आहे. वर्गनिहाय सॉफ्टवेअर उपलब्ध करून अध्यापन सुरू आहे. शैक्षणिक अॅप्स, शैक्षणिक व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखविले जातात. ‘खडू व फळा’ या संकल्पनेऐवजी टॅब व प्रोजेक्टद्वारे अध्यापन सुरू आहे. दृकश्राव्य माध्यमाचा वापर केल्यामुळे अध्ययनात विद्यार्थ्यांना आनंद वाटत आहे. व्हिडिओच्या माध्यमातून जगातील, देशातील काही क्षेत्रे व ठिकाणे पाहिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या लक्षात चिरकाल राहते. उदा. किल्ले, धरणे, पिके, वेशभूषा.
तंत्रस्नेही प्रशिक्षण घेतलेले शिक्षक अध्यापनात नवतंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. उर्वरित ५९ शाळांमध्ये अॅण्ड्राईड मोबाइल व मॅग्निफायर ग्लास यांचा वापर करून अध्यापन सुरू आहे. अशा प्रकारे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व ८४ शाळांमध्ये डिजिटलचे नवे वारे वाहत आहेत.
५९ मोबाइल डिजिटल शाळांमध्ये मोबाइलचा वापर करून अध्यापन केले जाते. शाळा डिजिटल होण्यासाठी सन २०१६-१७ मध्ये सात लाख ७५ हजार रुपये लोकसहभागातून घेण्यात आले. शासनाकडून काही शाळांना ई-लर्निंग साहित्य, प्रोजेक्टर, टॅब उपलब्ध करून देण्यात आले आहे. अजूनही लोकसहभागातून १०० टक्के शाळा डिजिटल करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. एरंडोल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा डिजिटल होण्यासाठी गावातील दानशूर व्यक्ती, शिक्षणप्रेमी नागरिकांनी पुढे येण्याची प्रतीक्षा आहे. सर्वांनी डिजिटल होणे काळाची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल करण्याची जबाबदारी केवळ शासन व प्रशासनाची नसून सर्वांची आहे. यासाठी सर्वांनी खारीचा वाटा उचलून ही डिजिटल क्रांती करू या, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
१०० टक्के शाळा डिजिटल करण्यासाठी अधिकाधिक लोकसहभाग मिळविला जाईल. प्रेरणासभा घेऊन जनतेचा सहभाग घेण्यासाठी नियोजन करण्यात येईल. अध्यापनात ई-लर्निंगचा वापर केल्यास गुणवत्तेत वाढ होते.
-एन.एफ.चौधरी,
गटशिक्षणाधिकारी,
पंचायत समिती, एरंडोल
कासोदा बीटमध्ये जिल्हा परिषदेच्या १२ प्राथमिक शाळा डिजिटल आहेत. त्यात उत्राण, अंतुर्ली, निपाणे, भातखेडे, बाह्मणे, आडगाव, कासोदा, फरकांडे, जवखेडेसीम, नांदखुर्द, खडकेसीम, पिंप्रीसीम या शाळांचा समावेश आहे.
-विश्वास पाटील,
शिक्षण विस्तार अधिकारी,
कासोदा बीट, ता. एरंडोल