झुणका भाकर केंद्रात मद्यपींचा धिंगाणा
By admin | Published: July 10, 2017 12:54 AM2017-07-10T00:54:16+5:302017-07-10T00:54:16+5:30
दोघांना घेतले ताब्यात : एक जण फरार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नवीन बसस्थानकाला लागून असलेल्या क्षुधा शांती झुणका भाकर केंद्रात रविवारी दुपारी साडे तीन वाजता तीन मद्यपींना चांगलाच धिंगाणा घातला. प्रचंड आरडाओरड व शिवीगाळ करीत असल्याने तिघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. महेश राजेंद्र तायडे (वय २२) व अमोल अशोक सपकाळे (वय १८) दोन्ही रा.जैनाबाद, जळगाव असे मद्यपी तरुणांची नावे आहेत. यांच्यातील एक जण पोलीस ठाण्यातून पळून गेला.
सलग दुसºया दिवशी मद्यपींनी धिंगाणा घातला.
झुणका भाकर केंद्रात महेश, अमोल व त्याचा मित्र असे तिन्ही जण जोरजोरात ओरडून शिवीगाळ करीत असल्याने जळगाव आगाराचे वाहक गोपाळ भिका पाटील (रा.जळगाव) हे त्यांना समजावण्यासाठी गेले असता तिघांनी पाटील यांना शिव्यांची लाखोली वाहून मारण्याच्या धमक्या दिल्या. यावेळी गोपाळ पाटील यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनशी संपर्क साधून पोलिसांना बोलावून घेतले.
उलटी करण्याच्या बहाण्याने काढला पळ
पोलिसांनी तिन्ही मद्यपी तरुणांना जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नेले. तेथेही त्यांचा धिंगाणा सुरुच होता. गोपाळ पाटील यांनी या तिन्ही मद्यपी तरुणांविरुध्द तक्रार दिली. त्यानंतर एक जण उलटी करण्याच्या बहाण्याने पोलीस ठाण्यातून पळून गेला. त्यामुळे पोलिसांनी दोन जणांविरुध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.