अवघ्या 10 वर्षांचा वाईल्डलाईफ फोटोग्राफर; पटकावला फोटोग्राफीचा मानाचा पुरस्कार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 03:29 PM2018-10-20T15:29:29+5:302018-10-20T15:30:38+5:30
बऱ्याचदा काही मुलं आपल्या लहान वयातचं अशी काही कामं करतात जी ऐकून त्यांच्याविषयी अभिमान वाटतो. असंच काहीसं काम अवघ्या 10 वर्षाच्या मुलानं केलं आहे.
बऱ्याचदा काही मुलं आपल्या लहान वयातचं अशी काही कामं करतात जी ऐकून त्यांच्याविषयी अभिमान वाटतो. असंच काहीसं काम अवघ्या 10 वर्षाच्या मुलानं केलं आहे. त्याच्या या कौशल्याने फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. जालंधरमध्ये राहणाऱ्या या छोट्या मुलाने वाइल्डलाइफ फोटोग्राफीचा जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आपल्या नावे केला आहे.
संपूर्ण जगभरातील लोकांना आपल्या नावाची दखल घ्यायला लावणाऱ्या या छोट्या उस्तादाचं नाव अर्शदीप सिंह असून त्याला 2018च्या 'वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द ईयर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी अर्शदीपने काढलेला फोटो 'Pipe Owls'हा ब्रिटनच्या नॅच्युरल हिस्टरी म्यूझिअमच्या कॅटगरीमध्ये सर्वात्कृष्ट फोटो ठरला आहे.
या फोटोबाबत सांगताना अर्शदीपने सांगितले की, त्याने हा फोटो पंजाबमधील कपूरथलामध्ये काढला होता. तो आपल्या बाबांसोबत तेथून जात असताना त्याने दोन घुबड उडत जाऊन एका पाईपमध्ये गेल्याचे पाहिले. त्याने लगेच वडिलांना सांगून ते बाहेर येण्याची वाट पाहूयात असे सांगितले. परंतु ते बाहर येतील की नाही ते माहिती नव्हते त्यांनी तिथेच गाडी थांबवून वाट पाहण्याचा निर्णय घेतला. जवळपास अर्धा तास वाट पाहिल्यानंतर पाईपमध्ये गेलेली दोन्ही घुबड बाहेर आली आणि त्याने हा फोटो काढला.
या फोटोला पुरस्कार जाहीर करताना नॅचरल हिस्ट्री म्यूझिअमने सांगितले की, 'आपल्या आवडीप्रती असलेली उत्सुकता आणि निरिक्षण यांमुळेच अर्शदिपला ही घुबडांची जोडी दिसली. त्याने थोडासा धीर धरला आणि हा विनिंग शॉर्ट आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला.' अर्शदीप आपल्या फेसबुक हॅन्डलवरून त्याने काढलेले फोटो पोस्ट करत असतो. आतापर्यंत त्याने अनेक विलोभनीय दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहेत.