107 घरांना आगी लागल्या, कारण एकच पण अत्यंत भयानक! वाचाल तर झोप उडेल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 07:31 PM2022-01-02T19:31:49+5:302022-01-02T19:47:12+5:30
मांजरींनी खेळाखेळात किचनमधील गॅसजवळ कागद किंवा कापड ठेवल्यामुळेही घरात आग लागल्याच्या घटना घडल्या. तर काही प्रकरणांमध्ये विजेची तार ओढल्याने स्पार्किंग होऊन आग लागल्याचंही समोर आलं आहे.
दक्षिण कोरियामध्ये गेल्या वर्षांत रहस्यमी पद्धतीने घराला आग (House Fire Incident) लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणांचा सखोल तपास केला असता आगीचं नेमकं कारण समोर आलं आहे. हे कारण जाणून पोलीसही हैराण झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीमागे इतर कोणीही नाही तर मांजर जबाबदार होत्या.
WION च्या रिपोर्टनुसार, ज्या घरांमध्ये आग लागली, तिथे मांजर पाळलेली होती किंवा त्या घरांमध्ये मांजरी येत-जात असत. तपासात असं समोर आलं की मांजरांनी घरात जळणाऱ्या मेणबत्ती खाली पाडल्या, यामुळे आसपासच्या कपड्यांना आणि कागदांना आग लागली. इतकंच नाही तर मांजरींनी खेळाखेळात किचनमधील गॅसजवळ कागद किंवा कापड ठेवल्यामुळेही घरात आग लागल्याच्या घटना घडल्या. तर काही प्रकरणांमध्ये विजेची तार ओढल्याने स्पार्किंग होऊन आग लागल्याचंही समोर आलं आहे. (Fire Caused by Cats)
सीएनएनच्या एका लेखानुसार, अग्निशामक दलाने गुरुवारी घोषणा केली की जानेवारी २०१९ आणि नोव्हेंबर २०२१ या काळात देशात रहस्यमयी पद्धतीने आग लागल्याच्या १०७ घटना घडल्या. या सर्व घटना मांजरीमुळे घडल्या होत्या. डिपार्टमेंटनं सांगितलं की विजेपासून किचनमधील गॅसपर्य़ंत कोणतंही उपकरण अधिक वेळ चालू राहिल्यास गरम होऊन यात आगीचा भडका होऊ शकतो.
रिपोर्टनुसार १०७ घटनांमधील अर्ध्याहून अधिक घटना तेव्हा घडल्या, जेव्हा घराचे मालक घरापासून दूर होते. मांजरींमुळे घडलेल्या या घटनांमध्ये ४ लोक आगीत जखमी झाले. विभागाचे अधिकारी Chung Gyo-chul म्हणाले की देशात मांजरामुळे आग लागल्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे घरातून बाहेर पडताना सावधान राहा आणि मांजरीला एकटीला घरात सोडू नका, असा सल्ला त्यांनी दिला आहे. सोबतच दक्षिण कोरिया सरकारने लोकांना सल्ला दिला आहे, की मांजर पाळणाऱ्या लोकांनी घरातून बाहेर पडताना गॅस आणि स्टोवर काहीतरी कव्हर लावावं किंवा ते व्यवस्थितरित्या बंद करून जावं.