हौसेला मोल नाही! 11 वर्षीय मुलाने खरेदी केली जमीन; हटके कारण वाचून व्हाल चकीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 03:11 PM2022-03-17T15:11:38+5:302022-03-17T15:12:54+5:30
हौसेखातर तर कधी कमाल करतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे.
लहान मुलांचे काही छंद, आवडीनिवडी या अगदी वेगळ्या असतात. मुलंदेखील त्यासाठी काहीही करतात. हौसेखातर तर कधी कमाल करतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. आयरलँडमध्ये राहणाऱ्या 11 वर्षांच्या एका मुलाने आपल्या एका हौसेखातर स्कॉटलंडमध्ये 5 चौरस फूट जमीन विकत घेतली आहे. अर्नोल्डर (Arnaldur Kjárr Arnþórsson) असं या मुलाचं नाव आहे. त्याने ही जमीन का विकत घेतली, यामागचं कारण समजल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.
आयरलँडमधल्या रेकजाविक (Reykjavík) मध्ये राहणाऱ्या अर्नोल्डरने स्कॉटलंडमध्ये 5 चौरस फूट जमीन खरेदी केली आहे. कारण त्याच्या नावापुढे 'लॉर्ड' ही पदवी हवी होती. लोकांनी आपल्याला लॉर्ड अर्नोल्डर (Lord Arnaldur) म्हणून ओळखावं, आपलं नाव लॉर्ड अर्नोल्डर असं घेतलं जावं, अशी त्याची इच्छा आहे. त्यामुळे त्याने ही जमीन खरेदीचा केल्याचं म्हटलं आहे. सध्या याची जोरदार चर्चा रंगली आहे.
अर्नोल्डरने स्कॉटलंडमध्ये3 हजार रुपयांना 5 चौरस फूट जमीन विकत घेतली आहे. त्याच्या देशात जमिनीच्या या एवढ्याशा तुकड्याला विशेष महत्त्व नसेल पण स्कॉटलंडमध्ये या जमिनीचा मालक असल्यानं सर्व जण त्याला 'लॉर्ड अर्नोल्डर' नावाने हाक मारतील. त्यामुळे ही जमीन खरेदी केल्याचं त्याने म्हटलं आहे. स्कॉटलंडमध्ये जमीन विकत घेतल्यानंतर स्वत:ला लॉर्ड्स म्हणवणार्या 'रॅग डॉल्स' याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला ही जमीन विकत घेण्याची कल्पना सुचली, असं त्यानं सांगितलं. मुलाने व्हिडिओ बघून गुगलवर (Google) याबाबत सर्च केलं.
'व्हॅलेंटाइन डे'ची ऑफर म्हणून त्याला जमिनीच्या किमतीत 80 टक्के सूट मिळाली. हा फायद्याचा व्यवहार पाहून त्याने ही जमीन विकत घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे वडील अर्नपोर यांना त्याबद्दल माहिती दिली. त्यांनीही या व्यवहाराला होकार दिला. त्यानंतर अर्नोल्डरनं वडिलांनी दिलेल्या पैशातून ही जमीन खरेदी केली. अर्नोल्डरनं आपल्याला लॉर्ड अशी हाक मारली जावी म्हणून स्कॉटलंडमध्ये जमीन खरेदी केली आहेच; पण त्याला तिथं जाऊन राहायचं देखील आहे. मात्र केवळ यामुळे आता अर्नोल्डरला लॉर्ड म्हटलं जाईल असं त्याच्या आईला वाटत नाही. तसंच त्याचे मित्रही अजून त्याला 'लॉर्ड अर्नोल्डर' अशी हाक मारत नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.