अबब! अवघ्या ३० सेकंदांच्या जाहिरातीसाठी १४ दशलक्ष डॉलर खर्च; ‘सुपर बॉल’ काय आहे?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 07:41 AM2022-02-15T07:41:56+5:302022-02-15T07:42:15+5:30
या कार्यक्रमादरम्यान उत्पादनाची जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी उद्योग-व्यावसायिकांमध्ये चढाओढ लागलेली असते.
वॉशिंग्टन : अमेरिकी टेलिव्हिजन जगतात तुफान लोकप्रिय असलेल्या ‘सुपर बॉल’ कार्यक्रमादरम्यान दाखविली जाणारी एक जाहिरात सध्या प्रचंड गाजत आहे. ‘कॉईनबेस’ या क्रिप्टोव्यवहारात कार्यरत असलेल्या कंपनीची ही जाहिरात आहे. अवघ्या ३० सेकंदांच्या जाहिरातीसाठी या कंपनीने तब्बल १४ दशलक्ष डॉलर खर्च केले आहेत.
‘सुपर बॉल’ काय आहे?
‘सुपर बॉल’ हा अमेरिकी टेलिव्हिजन जगतातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात महागडा कार्यक्रम आहे. प्रचंड दर्शकसंख्या असलेल्या नॅशनल फुटबॉल लीग सामन्यांचे थेट प्रक्षेपण ‘सुपर बॉल’मधून केले जाते. त्यामुळे या कार्यक्रमादरम्यान उत्पादनाची जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी उद्योग-व्यावसायिकांमध्ये चढाओढ लागलेली असते.
आहे काय जाहिरातीत?
‘कॉईनबेस’ने रंग बदलणाऱ्या क्यूआर कोडचे सादरीकरण केले असून, तो काळ्या स्क्रीनवर एका ठिकाणी आदळून दुसऱ्या ठिकाणी जातो. हे असे स्क्रीनवर ‘क्यूआर कोड’चे आंदोलन होत असताना तो सातत्याने रंग बदलतो. ३० सेकंदाची ही जाहिरात ‘सुपर बॉल’ कार्यक्रमात प्रदर्शित झाली आहे. ‘क्यूआर कोड’ मोबाईल फोनवर स्कॅन केल्यास युझरला बिटकॉइनच्या स्वरूपात १५ डॉलर देण्याची ऑफर कॉईनबेस कंपनीने दिली आहे. मंगळवारपर्यंत युझर्सनी हे केल्यास नशीबवान विजेत्याला ३० लाख डॉलरचे बक्षीसही मिळणार आहे. या ऑफरमुळे प्रेक्षकांच्या या जाहिरातीवर उड्या पडल्या आहेत.