तब्बल १४ श्वानांना इराणच्या तरुणीने घेतले दत्तक; 'ती' म्हणते, हेच माझे कुटुंब
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 10:55 AM2021-05-17T10:55:07+5:302021-05-17T10:55:39+5:30
पॉकेटमनीतून भागवतेय खर्च
मनीषा म्हात्रे
मुंबई : जिथे घरच्यांना घरातील अंध, अपंग व्यक्ती सहन होत नाहीत, त्याच ठिकाणी इराणची २९ वर्षीय डॉ. राया झंड ही तरुणी मुंबईतल्या रस्त्यावरील १४ अंध, अपंग श्वान दत्तक घेऊन, त्यांच्यासाठी सेवा करताना दिसत आहे. प्राणीप्रेमापोटी वयाच्या बाराव्या वर्षी घर सोडलेली डॉ. राया कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून कोरोनाबाधित विभागातील श्वानांसाठी धडपडत आहे.
मूळची इराणची रहिवासी असलेली डॉ. राया झंड सध्या मालाड परिसरातील ४ बीएचके फ्लॅटमध्ये राहते. लहानपणापासून प्राणीप्रेमामुळे तिने मांसाहार नाकारला. कुटुंबीय मांसाहारी असताना, “मी त्यांच्यावर प्रेम करते, त्यामुळे त्यांना खाऊ शकत नाही,” म्हणत घरातच बंड पुकारले. वयाच्या बाराव्या वर्षी एक मित्र त्याच्या श्वानाला मारताना पाहून तिला धक्का बसला. तिने त्याच्या तावडीतून श्वानाची सुटका करत तो श्वान घरी आणला. मात्र वडिलांनी विरोध केल्यामुळे तिने त्या श्वानासाठी घर सोडले आणि मावशीकडे जाऊन राहू लागली.
दिवसेंदिवस डॉ. रायाचे प्राणीप्रेम घरच्यांना जड जाऊ लागले तर दुसरीकडे इराणमध्ये होत असलेल्या प्राण्यांच्या हत्यांमुळे तिला तेथे राहणे अशक्य वाटू लागल्याने तिने पाच वर्षांपूर्वी अमेरिकेत राहण्यास असलेल्या आईकडे जात असल्याचे सांगत घर सोडून भारत गाठले. मुंबईतल्या मालाड भागात ती राहते. नुकतेच, गोरेगाव रेल्वेस्थानकात एका श्वानाकडे पाल ग्रुपच्या झंकार शहा यांचे लक्ष गेले. रेल्वेखाली चिरडण्यापूर्वी त्यांनी या श्वानाला ताब्यात घेत त्याचे प्राण वाचवले. या श्वानाला अशा अवस्थेत सोडल्यास पुन्हा कुठेतरी अपघातात त्याचा मृत्यू होऊ शकतो, या भीतीने त्याला कोणीतरी दत्तक घेण्याचे आवाहन त्यांनी केले. याच ग्रुपमध्ये असलेल्या डॉ. राया यांनी त्या श्वानाला आधार देत दत्तक घेतले. अशाच प्रकारे तिने तब्बल १४ श्वान दत्तक घेतले आहेत.
लसीकरण सुरू
ज्या भागात कोरोनाचे रुग्ण अधिक आहेत, अशा भागातील श्वानांना कुठला आजार होऊ नये म्हणून रेबीज लस देण्याची मोहीम तिने सुरू केली आहे. सध्या दिवसभर ती मुंबईतल्या गल्लीबोळात, कोरोनाची भीती न ठेवता जीव धोक्यात घालून ती फक्त या मुक्या जीवांसाठी धडपडताना दिसत आहे.
बेडरूम मुक्या जीवांसाठी
या श्वानांसह ती दिवाळी, गणपतीचा सणही साजरा करत आहे. या श्वानांसाठी घरातील बेडरूम तिने रंगीत दिव्यांनी सजवला आहे.