१७ लाखांचा हेअरकट; १० हजार किमी प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 05:33 AM2022-06-20T05:33:50+5:302022-06-20T05:34:10+5:30

Jara Hatke: तुम्हाला तुमच्या आवडीचा हेअरकट करायचा असला तर तुम्ही काय करता? तुमच्या नेहमीच्या सलूनवाल्याकडे जाता, तुम्हाला कसा हेअरकट करायचा आहे, हे त्याला विस्तारानं सांगता, त्यासंदर्भातला फोटो दाखवता.. आणि त्याच्याकडून तसा हेअरकट करवून घेता.

17 lakh haircut; 10 thousand km journey! | १७ लाखांचा हेअरकट; १० हजार किमी प्रवास!

१७ लाखांचा हेअरकट; १० हजार किमी प्रवास!

Next

तुम्हाला तुमच्या आवडीचा हेअरकट करायचा असला तर तुम्ही काय करता? तुमच्या नेहमीच्या सलूनवाल्याकडे जाता, तुम्हाला कसा हेअरकट करायचा आहे, हे त्याला विस्तारानं सांगता, त्यासंदर्भातला फोटो दाखवता.. आणि त्याच्याकडून तसा हेअरकट करवून घेता. आपल्या नेहमीच्या सलूनवाल्याला हे जमणार नाही, असं तुम्हाला वाटलं, किंवा तो फार पैसे सांगतोय असं वाटलं, तर तुम्ही आणखी कोणाकडे तरी जाता, त्याच्यापेक्षा चांगला मेकअप आर्टिस्ट शोधता आणि त्याला पैसे देता.. त्याच्याकडून तुमच्या मनासारखा हेअरकट करून घेता..
अमेरिकेतील एका तरुणीच्या बाबतीतही नेमका असाच किस्सा घडला. ब्रायन एलिस तिचं नाव. तिला तिच्या आवडीचा हेअरकट करायचा होता. त्यासाठी ती तिच्या नेहमीच्या सलूनवाल्याकडे गेली, त्याला हेअरकटचा फोटो दाखवला आणि त्याला सांगितलं, नेमका असाच हेअरकट मला हवाय. त्यात काहीही कमी नको, की जास्त नको. असा म्हणजे अस्साच! 
या आर्टिस्टनं तिला केवळ त्या हेअरकटचे किती पैसे सांगावेत? या हेअरकटसाठी साधारण चार हजार डॉलर्स (सुमारे ३.१२ लाख रुपये) खर्च येईल असं त्यानं तिला सांगितलं! शिवाय आता महागाई किती वाढली आहे, नेहमीच्या भावात परवडत नाही, तुम्ही निवडलेला हेअरकट एकदम खासमखास असल्यानं त्यासाठी प्रचंड मेहनतही घ्यावी लागेल.. वगैरे वगैरे उपदेशाचे बरेच डोस तिला पाजले!...
ब्रायनचं डोकं फिरलं. तिला थोडा रागही आला.. आपण दरवेळेस याच्याकडूनच हेअरकट करून घेतो, तो मागेल तितके पैसे त्याला देतो, तरीही दरवेळी तो पैसे वाढवतोच.. आपण म्हणजे काय त्याला पैशांचं झाड वाटलो की काय?.. तिनं आपल्या या सलूनवाल्याच्या नावावर काट मारली आणि इंटरनेटवर ती दुसरा हेअर स्टायलिस्ट शोधायला लागली आणि तिला हवा होता तसा हेअर स्टायलिस्ट सापडला! हा तर आणखी ‘ओरिजिनल’ होता!
वेगवेगळ्या प्रकारच्या, फॅन्सी, अफलातून आणि किचकट हेअरस्टाइलसाठीच तो फेमस होता. शिवाय त्याची फी तिच्या नेहमीच्या हेअर स्टायलिस्टच्या तुलनेत अत्यंत कमी होती. कमी म्हणजे किती कमी? नेहमीच्या स्टायलिस्टला तिला चार हजार डॉलर्स मोजावे लागणार होते, पण नेटवर जो हेअर स्टायलिस्ट ब्रायननं शोधला, त्याची फी तुलनेत अगदी कमी, म्हटलं तर ‘फुकटात’ होती. ज्या हेअरकटसाठी तिला चार हजार डॉलर्स लागणार होते, तोच हेअरकट संपूर्ण खर्चासह तिला फक्त ४५० डॉलर्समध्ये (सुमारे ३५ हजार रुपये) पडणार होता. फरक फक्त एवढाच होता, तिचा नेहमीचा हेअर स्टायलिस्ट अमेरिकेतलाच, तिच्या घराजवळचाच होता, हा नवा हेअर स्टायलिस्ट मात्र टर्कीमध्ये होता! 
ब्रायननं ठरवलं, टर्की तर टर्की, इतके पैसे वाचत असतील तर तिथे जाऊन हेअरकट करायला काय हरकत आहे? तिनं तसा निर्णयही घेतला. टर्कीच्या त्या हेअर स्टायलिस्टशी संपर्क साधला. तारीख नक्की केली आणि विमानानं ती टर्कीला पोहोचली. अमेरिका ते टर्की हे अंतर तब्बल दहा हजार किलोमीटरचं. तिथे जायचं तर काही दिवस तिथे राहणं आलं. हॉटेलात थांबणं 
आलं..
या साऱ्या गोष्टी ब्रायननं अतिशय आनंदानं केल्या. ठरल्याप्रमाणे या नव्या हेअर स्टायलिस्टला ती भेटली. तब्बल आठ तास खर्चून त्यानं ब्रायनला तिला हवा तसा हेअरकट करून दिला. एकदम डिट्टो. सेम टू सेम. ब्रायनही खूश झाली. आपल्या निर्णयाचं तिला अपरंपार कौतुक वाटलं. बेस्ट हेअरकट, शिवाय इतके पैसे आपण वाचवले याचाही तिला प्रचंड अभिमान वाटला. 
टर्कीहून परत येताच ब्रायननं आपल्या नव्या हेअरकटचा फोटो सोशल मीडियावर टाकला. त्या फोटोवर तिनं लिहिलं होतं, आपल्या आवडत्या हेअरकटसाठी अमेरिकेत जेव्हा तुमच्याकडे चार हजार डॉलर्सची मागणी केली जाते, त्यावेळी तुम्ही टर्कीच्या दिशेने उड्डाण घेता आणि आपलं स्वप्न साकार 
करता !..

‘खिसा फाटला’, हे कोण सांगणार?
ज्या हेअरकटसाठी ब्रायनला अमेरिकेत चार हजार डॉलर्स लागणार होते, तोच हेअरकट तिनं टर्कीमध्ये केवळ ४५० डॉलर्समध्ये करून घेऊन खूप पैसे वाचवले हे खरं, पण टर्कीला विमानानं जाणं, दोन आठवडे तिथे हॉटेलमध्ये राहाणं यासाठी तिला तब्बल २२ हजार डॉलर्स (सुमारे १७.१६ लाख रुपये) खर्च आला. हेदेखील ब्रायननंच सोशल मीडियावर शेअर केलं आहे; पण पैसे वाचवायच्या नादात ती पाच पटीपेक्षाही जास्त पैसे खर्च करून आली, हे तिला कोण सांगणार? ब्रायन आता सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होते आहे.

Web Title: 17 lakh haircut; 10 thousand km journey!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.