अरे देवा! "मी कधीपासून अटक होण्याची वाट पाहतेय"; पोलिसांनी पकडताच आनंदाने नाचू लागली तरुणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 12:42 PM2022-05-20T12:42:00+5:302022-05-20T12:44:33+5:30
वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केल्यानंतर एका अमेरिकन तरुणीने पोलिसांना जे सांगितले ते धक्कादायकच नाही तर मजेदारही होतं.
जगात विविध प्रकारचे लोक आहेत आणि प्रत्येकाच्या काही वेगवेगळ्या इच्छा किंवा स्वप्न आहेत. कधीकधी आपण लहानपणापासून काहीतरी इच्छा बाळगतो, परंतु त्या पूर्ण करू शकत नाही. जीवनात कधीतरी आपली ही हौस पूर्ण करण्याची इच्छा म्हणजेच आपली बकेट लिस्ट असते. प्रत्येकाची बकेट लिस्ट वेगळी असते. पण तुम्हाला जर कोणी अटक व्हावी अशी इच्छा सांगितली तर तुमचा विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केल्यानंतर एका अमेरिकन तरुणीने पोलिसांना जे सांगितले ते धक्कादायकच नाही तर मजेदारही होतं.
अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहणाऱ्या 19 वर्षीय जानिया (Janiya Shaimiracle Douglas) या तरुणीची ही विचित्र इच्छा सध्या जोरदार चर्चेत आहे. सामान्यत: लोकांची इच्छा आकाशात उडणे, समुद्रात डुबकी मारणे, मोठ्याने गाणं म्हणणं किंवा सहलीला जाणं असते, परंतु जानियाची इच्छा वेगळीच होती. तिला वाटायचं की आयुष्यात एकदा तरी तिला पोलिसांनी अटक करून तुरुंगात नेलं पाहिजे. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने वाहतूकीचा नियम मोडला आहे.
मिररच्या रिपोर्टनुसार, होमस्टेडमध्ये राहणारी 19 वर्षीय जानिया सकाळी 7.47 वाजता वेगात गाडी चालवताना पोलिसांना दिसली. Monroe County Sheriff कडून जानियावर वाहनाच्या लाईट्स चालू ठेवून वेगाने वाहन चालवण्याचा आणि क्रॉसरोडवर थांबल्याचा आरोप करण्यात आला. जेव्हा पोलिसांनी तिला ही चूक सांगितली आणि कारवाईची माहिती दिली तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. सार्जंट रॉबर्ट डोश म्हणतात की तिने त्यांना सांगितलं की - 'पोलिसांनी अटक करावी ही तिची शाळेत असतानापासूनची इच्छा होती'.
या प्रकरणी जानियाला अटक करण्यात आली आणि पोलिसांपासून पळून गेल्याने तिची तुरुंगात रवानगी झाली. ही विचित्र घटना पोलिसांनी आपल्या फेसबुक पेजवरही शेअर केली आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर बहुतेकांना हे जाणून आश्चर्य वाटलं की एवढ्या लहान वयात तुरुंगात जाण्याची कुणाची मनापासून इच्छा कशी काय असू शकते? यावर एका यूजरने कमेंट केली की, बहुतेक वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत मानवी मेंदूचा विकास पूर्ण होत नाही. फ्लोरिडामध्ये घडलेली ही पहिली विचित्र घटना नाही. इथे अनेकदा लहान मुलांना बंदुकीसोबत घराबाहेर पडल्याने पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.