मृत्यूनंतर २ तासांनी युवक पुन्हा जिवंत झाला; डॉक्टर म्हणाले, "हा चमत्कारच..."
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 09:01 PM2023-04-18T21:01:49+5:302023-04-18T21:02:08+5:30
सॅमीच्या निधनाची बातमी ऐकताच कुटुंबाला धक्का बसला. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होते.
देव तारी त्याला कोण मारी...ही म्हण सगळ्यांनीच ऐकली असेल. परंतु अनेकदा असे काही चमत्कार घडतात ज्यात मृत्यूनंतरही जिवंत होण्याचे दावे केले जातात. १६ वर्षीय मुलगा सॅमी बरकोसोबत असेच काहीसे घडले. हा मुलगा काही मिनिटांसाठी नव्हे तर पूर्ण २ तासांसाठी मृत झाला होता. टेक्सासच्या मिसौरी शहरात रॉक क्लाइबिंग करताना सॅमीला हार्ट अटॅक आला आणि त्याच्या शरीराने काम करणे बंद केले.
२ तास सीपीआर दिला
अचानक सॅमीचा तब्येत ढासळल्याने त्याला रुग्णालयात आणले गेले. तिथे सॅमीच्या शरीराने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. तरीही डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न सोडले नाहीत. तब्बल २ तास सॅमीला सीपीआर देण्यात आला. त्याचा काही फायदा झाला नाही तेव्हा डॉक्टरांनी सॅमीच्या कुटुंबाला त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. परंतु दैवाच्या मनात काही वेगळाच होतं.
सॅमीच्या निधनाची बातमी ऐकताच कुटुंबाला धक्का बसला. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होते. परंतु त्याचवेळी कुटुंबातील एका सदस्याने सॅमीच्या शरीराची हालचाल पाहिली. ते पाहून त्याने मोठ्याने डॉक्टरांना आवाज दिला. डॉक्टर तातडीने त्याठिकाणी आले आणि सॅमीला उपचार केले. सॅमीच्या शरिरानेही प्रतिसाद दिला. ही गोष्ट एका चमत्कारापेक्षा कमी नसल्याचे डॉक्टर म्हणाले. देवाने आमचे ऐकलं, माझ्या मुलाला पुन्हा जिवंत केले अशी भावना सॅमीच्या आईने व्यक्त केली.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सॅमीच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा बराच काळ झाला नाही. त्यामुळे त्याला सूपर रेयर जेनेटिक डिसॉर्डर झाल्याने त्याच्या हार्टवर अफेक्ट झाला. सॅमीला शॉर्ट टर्म मेमोरी लॉस झाली होती. त्याला पूर्ण घटना लक्षात नाही. परंतु काही गोष्टी तुरळक लक्षात आहेत. त्यादिवशी नेमकं काय घडले हे सॅमीला माहिती नाही. या घटनेनंतर पूर्णत: ठीक व्हायला त्याला महिनाभर रुग्णालयात दाखल व्हावे लागले. आता तो ठीक आहे.