‘हे’ आहे स्वच्छ भारत मिशन...; शौचालयाचा अजब फोटो पाहून हसण्याआधी काय घडलंय ते तरी वाचा
By प्रविण मरगळे | Published: March 5, 2021 06:44 PM2021-03-05T18:44:56+5:302021-03-05T18:45:14+5:30
म्हणजे एकाच शौचालयात एकाच वेळी दोघांना बसण्याची अजब सुविधा केल्याचा प्रकार समोर आला आहे.
बस्ती – स्वच्छ भारत मिशनतंर्गत प्रत्येक गावात गरजूंसाठी शौचालय उभारण्याची योजना सरकारने आणली, त्यानंतर आता गावात सार्वजनिक शौचालयाचं बांधकाम केले जात आहे. याचवेळी बस्ती जिल्ह्यातील भिऊरा गावात बनवण्यात येत असलेल्या सार्वजनिक शौचालयाचा एक अजबगजब फोटो सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. याठिकाणी एका शौचालयात बसण्यासाठी दोन भांडी बसवण्यात आली आहेत.
म्हणजे एकाच शौचालयात एकाच वेळी दोघांना बसण्याची अजब सुविधा केल्याचा प्रकार समोर आला आहे. बस्ती जिल्हा पंचायतीचे अतिहुशार आणि काहीतरी वेगळं विचारं करणाऱ्या अधिकाऱ्यांनी हा प्रताप करून दाखवला आहे. जो अजब प्रकार पाहून इंजिनिअर, गावकरी आणि इतर अधिकाऱ्यांचेही डोळे वटारले आहेत. भिऊरा गावात सार्वजनिक शौचालयात एका टॉयलेटमध्ये दोन भांडी बसवण्यात आली आहेत. या अजब शौचालयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
स्वच्छ भारत अभियानातंर्गत १० लाख रूपये खर्च करून अशाप्रकारे या योजनेची खिल्लीच उडवल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. हे प्रकरण गाजत असतानाच काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अंकुर वर्मा यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणाची चौकशी व्हावी असं त्यांनी म्हटलं आहे, स्वच्छ भारत मिशनमध्ये यापेक्षा मोठा भ्रष्टाचार काहीच असू शकत नाही. तर आयुक्त अनिल सागर यांनी या प्रकरणाची दखल घेत हे फोटो हास्यास्पद असले तरी गंभीर बेजबाबदारपणाचं आहे. याची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.