बापरे! पोलीस स्टेशनमध्ये सापडली कोब्राची तब्बल २१ पिल्ले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 02:47 PM2020-08-17T14:47:51+5:302020-08-17T14:55:25+5:30
हिमाचल प्रदेशातील कांग्रा शहराजवळील गग्गल पोलीस स्टेशनमध्ये कोब्रा सापाची तब्बल २१ पिल्ले सापडली.
साप असे म्हटले की भल्याभल्यांची बोबडी वळते. त्यात सापाची तब्बल २१ पिल्ले सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ही कोब्रा जातीच्या सापाची पिल्ले चक्क पोलीस स्टेशनमधील कपाटात आढळून आली आहेत. ज्यावेळी पोलीस कर्मचारी कपाटात ठेवलेली एक ऑफिशियल फाईल शोधत होता, त्यावेळी सापाची पिल्ले पाहून पोलीस कर्मचाऱ्याला धक्काच बसला.
हिमाचल प्रदेशातील कांग्रा शहराजवळील गग्गल पोलीस स्टेशनमध्ये कोब्रा सापाची तब्बल २१ पिल्ले सापडली. या पोलीस स्टेशनमधील कपाटात असलेल्या फायलींमध्ये कोब्रा साप आपले घर करून बसला होता. दरम्यान, एका प्रकरणासंदर्भात पोलीस कर्मचारी कपाटात असलेली फाईल काढत असताना त्याला एका कोब्रा सापाचे एक पिल्लू दिसले. साप पाहून त्यांना धक्का बसला. त्यानंतर पोलिसांनी साप पकडणाऱ्या व्यक्तीला बोलाविले.
साप पकडणारा व्यक्ती ज्यावेळी आला, त्यावेळी एकेक अशी कपाटातून तब्बल २१ सापाची पिल्ले बाहेर आली. इतके साप पाहून संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर साप पकडणाऱ्या व्यक्तीने सर्व सापाच्या पिल्लांना एका डब्यात पकडले. त्यावेळी येथील सर्वांच्या जीवात जीव आला.