VIDEO: २२ वर्षांचा तरुण करतोय चौथ्या लग्नाची तयारी; तीन बायकांसह घेतोय चौथीचा शोध
By कुणाल गवाणकर | Updated: November 19, 2020 23:10 IST2020-11-19T23:09:57+5:302020-11-19T23:10:11+5:30
पतीसोबत एकत्र नांदताहेत तीन पत्नी; चौथ्या पत्नीचा शोध सुरू

VIDEO: २२ वर्षांचा तरुण करतोय चौथ्या लग्नाची तयारी; तीन बायकांसह घेतोय चौथीचा शोध
लग्न पाहावं करून, लग्न एकदाच होतं, अशा गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. शादी ऐसा लड्डू है, जो खाये वो पछताए और ना खाए वो भी पछताए, असंही तुम्ही ऐकलं असेल. पण पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये एक तरूण एकदा नव्हे, तर चौथ्यांदा लग्न बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे तो सध्या त्याच्या तीन पत्नींसह आनंदात राहतोय आणि त्याहून विशेष म्हणजे या तिन्ही पत्नी आपल्या पतीसाठी चौथ्या मुलीचा शोध घेताहेत.
सियालकोटमध्ये वास्तव्यास असणारा अदनान सध्या चौथ्या विवाहासाठी मुलगी शोधतोय. अदनानचं वय सध्या २२ वर्षे आहे. वयाच्या १६ व्या वर्षी विद्यार्थी असताना त्याचा पहिला निकाह झाला. त्यानंतर चौथ्या वर्षी त्यानं पुन्हा निकाह केला. तर गेल्याच वर्षी त्यानं तिसरा निकाह केला. आता अदनान चौथ्या निकाहाच्या तयारीत आहे. त्यासाठी मुलीचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे अदनानच्या तिन्ही पत्नी यामध्ये त्याला मदत करताहेत.
माझ्या तिन्ही पत्नी चौथ्या पत्नीच्या शोधासाठी प्रयत्न करत असल्याचं अदनाननं एका पाकिस्तानी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 'माझ्या तिन्ही पत्नींची नाव 'एस'वरून सुरू होतात. चौथी पत्नीदेखील एसवरूनच नाव सुरू होणारी असेल, अशी अपेक्षा आहे,' असं अदनान म्हणाले. शुंबल, शबाना आणि शाहिदा अशी अदनान यांच्या तीन पत्नींची नावं आहेत.
लग्नानंतर माझी आर्थिक परिस्थिती सुधारल्याचं अदनान यांनी सांगितलं. 'माझा मासिक खर्च एक ते दीड लाख इतका आहे. १६ वर्षांचा असताना माझा पहिला निकाह झाला. प्रत्येक निकाहानंतर माझी आर्थिक स्थिती सुधारत गेली,' असं अदनान म्हणाले. अदनान यांच्या पत्नींची एकमेकांसोबत भांडणं होत नाहीत. त्यांचे अदनान यांच्यासोबतही वाद होत नाहीत. पण अदनान पुरेसं लक्ष देत नसल्याची तिन्ही पत्नींची तक्रार आहे. तिन्ही पत्नींनी घरातल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत.