बोंबला! सेनेत भरती व्हावं लागू नये म्हणून २४ वर्षीय तरूणाचं ८१ वर्षीय महिलेशी लग्न!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 01:03 PM2019-10-01T13:03:46+5:302019-10-01T13:05:44+5:30
एका २४ वर्षीय तरूणीने सेनेत भरती व्हावं लागू नये म्हणून आपल्या आजीसोबतच लग्न केलं. या आजीचं वय ८१ वर्षे आहे.
(Image Credit : couponskingdom.in)
यूक्रेनमध्ये एक आश्चर्यकारक आणि अवाक् करणारी घटना समोर आली आहे. इथे एका २४ वर्षीय तरूणाने सेनेत भरती व्हावं लागू नये म्हणून आपल्या आजीसोबतच लग्न केलं. या आजीचं वय ८१ वर्षे आहे. एकीकडे या घटनेची सोशल मीडियात चर्चा रंगली असताना दुसरीकडे या तरूणावर टिकाही होत आहे. पण कायदा त्याच्यासोबत आहे. म्हणजे त्याने जे केलं ते कायदेशीररित्या योग्य आहे.
सेनेत जाणं बंधनकारक
अलेक्झांडर कोंड्राट्यूक नावाचा हा तरूण यूक्रेनमधील विन्नित्सा शहरात राहतो. यूक्रेनमध्ये १८ ते २६ वयोगटातील प्रत्येक व्यक्तीला सेनेत सेवा करणं अनिवार्य आहे. त्यानुसार २०१७ मध्ये अलेक्झांडर यालाही याबाबत एक पत्र मिळालं होतं. प्रत्येक तरूणाला एक वर्ष सेनेत सेवा करावी लागते. अलेक्झांडरला सेनेत जायचं नव्हतं. त्यामुळे त्याने नियमांची तोडमोड करण्याचं ठरवलं.
रिपोर्ट्सनुसार, सेनेतील सेवेतून कुणाचीही सुटका होऊ शकत नाही. पण जर त्या व्यक्तीवर दिव्यांग व्यक्तीला सांभाळण्याची जबाबदारी असेल तर त्याला सूट मिळते. अलेक्झांडरने हाच नियम वापरला. तो त्याच्या एका चुलत आजीकडे गेला. जिनाइडा नावाच्या या आजीला त्याने केवळ लग्नाचा प्रस्तावच दिला नाही तर तिला लग्नासाठी तयारही केलं. त्यावेळी आजीचं वय ७९ तर अलेक्झांडरचं वय २२ वर्ष होतं. त्याचं सेनेत भरती होणं टळलं.
हे प्रकरण २०१८ मध्ये समोर आलं होतं. त्यावेळी सेनेकडून हे लग्न रद्द ठरवण्यासाठी याचिका करण्यात आली होती. सेनेकडून असं सांगण्यात आलं की, अलेक्झांडरने दिलेली लग्नाची कागदपत्रे खोटी आहेत. पण चौकशी केल्यावर समोर आले की, दोघांनी लग्न केलं.
दोन वर्षांनी पुन्हा प्रकरण चर्चेत
सिव्हिल अॅक्ट रजिस्ट्रेशन ऑफिसने हे लग्न कायदेशीर मानलं आहे. त्यामुळे सेनेला माघार घ्यावी लागली. पण मीडियाने पुन्हा एकदा हे प्रकरण धरून लावलं. मीडियाने सेनेला विचारलं की, भविष्यात अलेक्झांडरसारखं एखादं प्रकरण होऊ नये, यासाठी सेनेने नियमांमध्ये बदल केलेत का?
अलेक्झांडरची पत्नी काय म्हणते...
प्रकरण चर्चेत आल्यावर पुन्हा अलेक्झांडरची ८१ वर्षीय पत्नी जिनाइडासोबत संपर्क केला गेला. तिने सांगितले की, अलेक्झांडर तिचा पती आहे आणि तो तिची फार काळजी घेतो. तर दुसरीकडे अलेक्झांडरने सुद्धा हे स्पष्ट केलं की, त्याने सेनेत जावं लागू नये म्हणून लग्न केलं नाही. तो म्हणाला की, त्याचं जिनाइडावर प्रेम आहे आणि तिचा त्याला काळजी घ्यायची आहे.