रातोरात बनला करोडपती! बँक खात्यात अचानक आले 25 कोटी रुपये, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 04:59 PM2022-05-07T16:59:10+5:302022-05-07T17:43:32+5:30
50 हजार रुपये खर्च करण्याचे नियोजन सुरू केले. पण त्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. वास्तव समजल्यानंतर तो निराश झाला.
एका व्यक्तीच्या बँक खात्यात अचानक कोट्यवधी रुपये आल्याने तो आश्चर्यचकित झाला. बँक खात्यात एवढी मोठी रक्कम पाहून व्यक्तीच्या आनंदाला पारावार उरला नाही. 50 हजार रुपये खर्च करण्याचे नियोजन सुरू केले. पण त्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. वास्तव समजल्यानंतर तो निराश झाला.
'द सन'च्या वृत्तानुसार, हा व्यक्ती ब्रिटनचा रहिवासी असून त्याचे नाव मायकल कार्पेंटर (Michael Carpenter) आहे. मायकेल एका रात्रीत करोडपती झाला, पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मायकलने स्टॉक्स फर्म (Stocks Firm) Hargreaves Lansdownमध्ये 1 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक केली होती. अलीकडेच, एके दिवशी सकाळी उठून त्याने पाहिले की या पैशाने तो करोडपती झाला आहे. त्याच्या स्टॉकने त्याला 2,200 टक्के परतावा दिला आणि त्याची रक्कम एका रात्रीत 25 कोटींहून अधिक झाली, हे पाहून मायकेल आश्चर्यचकित झाला.
मायकेलच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मात्र अनेकवेळा खाते पाहिल्यानंतर खरोखरच 25 कोटी रुपये आल्याची खात्री पटल्यावर तो खूप खुश झाला. मात्र, काही वेळातच त्याच्या लक्षात आले आणि विचार केला की, कुठलाही स्टॉक एका रात्रीत इतका कसा वाढू शकतो? अशा परिस्थितीत मायकलने माहितीसाठी Hargreaves Lansdown फर्मला फोन केला. फर्मने तपासले तेव्हा कळले की त्रुटीमुळे ती रक्कम मायकलच्या खात्यात दिसत आहे.
याबाबत कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, या स्टॉकशी संबंधित रक्कम ग्राहकांच्या खात्यात चुकीची दर्शवत होती, ती दुरुस्त करण्यात आली आहे. हे समजल्यानंतर मायकेल निराश झाला. मात्र, सुरुवातीला त्याला काहीतरी गडबड आहे असे वाटल्याने त्याने फर्मला फोन करून खात्री केली.