डिटर्जेंट पावडरमधून महिला करत होती सोन्याची तस्करी, आयडिया पाहून अधिकारी झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 10:47 AM2023-12-02T10:47:01+5:302023-12-02T10:48:20+5:30
हैद्राबाद एयरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यांनी सोन्याची तस्करी करणारी व्यक्ती पकडली आहे.
जगभरात स्मगलिंगच्या वेगवेगळ्या केसेस रोज समोर येत असतात. कुठे ड्रग्स स्मगल केलं जातं तर कुठे सोनं. आतापर्यंत स्मगलिंगच्या अनेक केसेसबाबत तुम्ही ऐकलं असेल. कधी एखाद्या व्यक्तीने शरीरात सोनं लपवलं, तर कुणी विगमध्ये...पण काही केसेस अशा असतात ज्या हैराण करतात. हैद्राबाद एयरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यांनी सोन्याची तस्करी करणारी व्यक्ती पकडली आहे. त्याच्या स्मगलिंगच्या पद्धतीने सगळ्यांना हैराण केलं.
मीडिया रिपोर्टनुसार, हे सोनं दुबईहून भारतात आणण्यात आलं होतं. नियमांनुसार काही प्रमाणात सोनं दुबईहून भारतात आणता येतं. दुबईमध्ये भारताच्या तुलनेत सोन्याचे भाव कमी आहेत. त्यामुळे अनेक लोक प्रयत्न करतात की, जास्तीत जास्त सोनं दुबईहून आणता यावं. पण टॅक्स वाचवण्याच्या नादात ते याचं स्मगलिंग करू लागतात. गोल्ड स्मगलिंगच्या केसमध्ये पोलिसांनी हैद्राबाद एअरपोर्टवर 26 लाख 64 हजार रूपये किंमतीचं सोनं पकडलं आहे.
फारच अनोखी होती पद्धत
आतापर्यंत कस्टम अधिकाऱ्यांनी स्मगलिंगच्या वेगवेगळ्या पद्धतीने पाहिल्या आहेत. कधी कुणी कपड्यांमध्ये सोनं लपवतात तर कुणी पार्श्वभागात लपवतात. पण यावेळची पद्धत फारच यूनिक होती. सोन्याची तस्करी करण्यासाठी यावेळी सोन्याचं पावडर करण्यात आलं. त्यानंतर ते डिटर्जेंट पावडरच्या पॅकेटमध्ये मिक्स केलं. पण त्यानंतरही हे सोनं पकडण्यात आलं.
पाण्यात टाकताच झालं वेगळं
जेव्हा वस्तू चेक करण्यात आल्या तेव्हा त्यात डिटर्जेंटचं पॅकेट सापडलं. हे डिटर्जेंट एका प्लेटमध्ये टाकण्यात आलं आणि त्यात पाणी टाकलं. तेव्हा सत्य समोर आलं. डिटर्जेंट पाण्यात विरघळलं आणि सोनं तसंच खाली राहिलं. ही आयडिया बघून कस्टम अधिकारीही हैराण झाले. याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आणि लगेच व्हायरल झाला.