हौसेला मोल नाही! फिरण्याचा छंद जोपासण्यासाठी घेतला मोठा निर्णय, रक्त विकतेय 'ही' तरुणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 04:10 PM2022-03-04T16:10:09+5:302022-03-04T16:11:18+5:30
तरुणीने आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.
एखादी व्यक्ती छंदासाठी, आपली आवड जोपासण्यासाठी वाटेल ते करते. लहानपणी खूप स्वप्न पाहिलेली असतात पण अनेकदा ती काही कारणांमुळे पूर्ण होऊ शकत नाहीत. एका तरुणीने आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील पेनिसिल्व्हेनियामध्ये राहणारी लीझ ग्रॅमलिच (Liz Gramlich) रक्ताचा वापर करून प्रवासाचा छंद पूर्ण करत आहे. 28 वर्षांच्या लीझने डिस्ने वर्ल्डमध्ये फिरायला जाण्यासाठी रक्त विकण्याचा आणि त्यातून प्रवासाचा खर्च भागवण्याचा निर्णय घेतला.
आपलं स्वप्न पूर्ण करण्यात पैशांचा अडथळा येऊ नये म्हणून लीझने आठवड्यातून दोन वेळा प्लाझ्मा दान करण्याचं ठरवलं. लीझला डिस्ने वर्ल्ड ट्रिपचं (Disney World Trip) विलक्षण आकर्षण आहे. 2020 च्या उन्हाळ्यापासून तिनं ऑरलँडो आणि फ्लोरिडाला सुमारे 15 वेळा भेट दिली आहे आणि 2022 मध्ये दर महिन्याला येथे किमान एकदा भेट देण्याची तिची योजना आहे. अर्थात पेनिसिल्व्हेनिया ते फ्लोरिडा असा प्रवास दर महिन्याला करणं तितकं सोपं आणि स्वस्त नाही. आपला हा छंद पूर्ण करण्यासाठी तिनं आपलं रक्त विकण्याचा बेत आखला.
ग्रॅमलिच लहानपणी एकदा डिस्ने वर्ल्ड ट्रिपला गेली होती, पण तिला पुन्हा तिथं जायचं आहे. तिचा हा छंद तिने 2020 मध्ये पूर्ण केला. पण कोरोनाच्या साथीमुळे सर्व काही ठप्प झाल्याने तिची योजना अर्ध्यावर राहिली. त्यामुळे 2022 मध्ये तिने दर महिन्याला इथं येण्याचा निर्णय घेतला. ग्रॅमलिच डिस्ने वर्ल्डची पासहोल्डर असली तरी, तिथं ये-जा करण्यासाठी विमानाची तिकिटं, हॉटेलमध्ये राहणं आणि खाण्या-पिण्याची व्यवस्था करणं ही मोठी आव्हानं तिच्यासमोर होती.
ग्रॅमलिच नेहमीच प्लाझ्मा दान करत आली आहे. पण त्यामुळे होणाऱ्या फायद्याकडे तिने कधी फारसं लक्ष दिलं नाही. पण यातून कमाई केल्यास गरज पूर्ण होऊ शकते आणि प्लाझ्मामुळे दुसऱ्यालाही जीवदान मिळतं, असं तिला वाटू लागलं. अशा परिस्थितीत तिनं वारंवार प्लाझ्मा दान करण्याबाबत विचार केला आणि आठवड्यातून दोनदा रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. आठवड्यातून दोन वेळा प्लाझ्मा दान करून ती 56,823 रुपये ते 94,662 रुपये कमवत होती. या रकमेतील बहुतांश हिस्सा थीम पार्कसाठी खर्च करण्याचा निर्णय तिने घेतला आहे. एक हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.