बाबो! 16 वर्षांनी पुनर्जन्माचा दावा, गेल्या जन्मातील आई-वडिलांना 'त्याने' ओळखलं, मृत्यूचं कारण सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 06:25 PM2022-02-12T18:25:25+5:302022-02-12T18:32:53+5:30
एका 3 वर्षाच्या मुलाने आपल्या गेल्या जन्मातील आई वडिलांना ओळखलं आहे. तसेच त्याचं नाव मोहित असूनही तो आपलं नाव 'तोरण' असल्याचं सांगत आहे.
नवी दिल्ली - चित्रपट अथवा एखाद्या मालिकेमध्ये पुनर्जन्माच्या काही गोष्टी आपण नेहमीच पाहत असतो. पण खऱ्या आयुष्यात देखील पुनर्जन्म झाल्याचं कोणी सांगितलं तर सुरुवातीला आपला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. राजस्थानच्या झालावड जिल्ह्यातील खजूरी गावात अशीच एक घटना घडली आहे. येथील एका 3 वर्षाच्या मुलाने आपल्या गेल्या जन्मातील आई वडिलांना ओळखलं आहे. तसेच त्याचं नाव मोहित असूनही तो आपलं नाव 'तोरण' असल्याचं सांगत आहे. 16 वर्षांपूर्वी त्याचा मृत्यू कसा झाला, याचा घटनाक्रमही त्याने अगदी बरोबर सांगितला आहे.
मुलाच्या आई-वडिलांना सुरुवातीला हे खरंच वाटलं नाही. त्यांनी मुलाच्या बोलण्यावर विश्वासच ठेवला नाही. पण नंतर अनेक गोष्टी समोर आल्यावर त्यांनाही धक्काच बसला. सर्वत्र सध्या याच गोष्टीची चर्चा रंगली आहे. जवळच्याच एका गावात 16 वर्षांपूर्वी तोरण नावाच्या मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांना कळाली. त्यानुसार मोहितच्या आई वडिलांनी मोहितला तोरणच्या आई वडिलांची आणि इतर नातेवाईकांची भेट घडवून आणली. यावेळी मोहितने आपण तोरण असल्याचं सांगत आपल्या गेल्या जन्मातील आई वडिलांना देखील ओळखलं आहे
मिळालेल्या माहितीनुसार, 16 वर्षांपूर्वी मनोहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोलुखेडी कला येथे रस्त्याचं काम करणाऱ्या खजुरी येथील 25 वर्षीय तोरण कल्याणसिंग धाकड या तरुणाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तोरणच्या आई-वडिलांनी आपलं घर विकून ते मध्य प्रदेशातील गुणा जिल्ह्यातील शंकरपुरा गावात (जामनेर) राहायला गेले. पण तोरणची आत्या नथिया बाई धाकड या खजुरीलाच राहत होत्या. ही माहिती मिळाल्यानंतर मोहितचे आई वडील त्याला घेऊन नथियाबाई यांना भेटायला आले. यावेळी 3 वर्षांच्या मोहीतने आपल्या आत्याला पटकन ओळखलं. यानंतर आत्याने तोरणच्या पालकांना याची माहिती दिली.
मोहितने आपल्या गेल्या जन्मातील आई वडिलांना देखील ओळखलं आहे. मोहित केवळ त्याचं नाव तोरण आहे, असं सांगत नाही, तर त्याच्या मागच्या जन्मातील मृत्यूची घटनाही त्याला माहीत आहे. या घटनेबाबत विचारल्यानंतर झालावाड मेडिकल कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. कृष्णा मुरारी लोढा यांनी सांगितलं की, माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा मेंदू मृत होतो. त्याची स्मरणशक्ती पूर्णपणे नाहीशी होते. एखाद्या व्यक्तीचा जन्म नवीन मेंदू आणि नवीन शरीरासह होतो. मेमरी कधीही एका शरीरातून दुसऱ्या शरीरात हस्तांतरित केली जाऊ शकत नाही. कुटुंबातील सदस्यांचं किंवा इतर काही लोकांचं बोलणं त्या मुलानं ऐकलं असावं. त्यामुळे तोही असं बोलत असावा, असा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.